3
बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश
1
येशू अजूनही नासरेथ गावातच असता योहान, ज्याला लोक बाप्तिस्मा करणारा म्हणतात, तो यहूदा प्रांतातील ओसाड प्रदेशात गेला. तेथे येणाऱ्या सर्व लोकांना तो उपदेश करत होता.
2
तो म्हणत असे, “तुम्ही पाप करणे थांबवले पाहिजे, कारण देव लवकरच दाखवून देईल की तो राजा आहे, तुम्ही जर पाप करणे थांबवले नाही तर तो तुमचा नकार करेल.”
3
योहानाने उपदेश करण्यास सुरवात केली, तेव्हा फार काळापूर्वी यशया संदेष्टा जे काही बोलला ते खरे ठरले. तो म्हणाला,
“अरण्यामध्ये कोणाचा तरी आवाज लोकांना ऐकू येत आहे, तो येणाऱ्या प्रत्येकाला ओरडून म्हणत आहे,
प्रभू येईल तेव्हा त्याचा स्वीकार करण्यासाठी तयार असा!
त्याच्यासाठी सर्वकाही तयार करा!”
4
योहान हा उंटाच्या केसापासून बनवलेले खरबरीत वस्त्र घालत असे. जसा एलिया संदेष्टा फार काळापूर्वी घालत होता तसा, चामड्याचा कमरबंद आपल्या कंबरे भोवती घालत असे. अरण्यात आढळणारा मध आणि नाकतोडे हेच मात्र त्याचे अन्न होते.
5
यरुशलेम शहरामध्ये राहणारे लोक, यहूदा जिल्ह्यातील इतर ठिकाणातील अनेक लोक, आणि यार्देन नदी जवळ राहणारे इतर पुष्कळ लोक हे सर्व योहानाचा उपदेश ऐकण्यासाठी येत होते.
6
त्यांनी त्याचे ऐकल्यानंतर ते, उघडपणे त्यांच्या पापांची कबुली देत असत, आणि मग तो त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा देत असे.
7
परंतु योहानाने पाहिले की अनेक परूशी आणि सदूकी बाप्तिस्मा घेण्यासाठी त्याच्याकडे येत आहेत. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक विषारी सापाची पिल्ले आहात! जो कोणी पाप करतो, त्या प्रत्येकाला देव एके दिवशी शिक्षा करील ह्या विषयी तुम्हांला कोणी सावध केले?
8
जर खरोखर तुम्ही पाप करणे थांबवले, तर ते दर्शविण्यासाठी योग्य त्या गोष्टी करा.
9
देवाने अब्राहामाच्या वंशजांना दिलेले वचन मला ठाऊक आहे. परंतु आपल्या स्वतःशी असे म्हणू नका, ‘आम्ही आमचा पूर्वज अब्राहामाचे वंशज आहोत, म्हणून आमच्या पापासाठी देव आम्हांला शासन करणार नाही. ' मी तुम्हास सांगतो की देव ह्या धोंड्याचे रुपांतर अब्राहामाच्या वंशजांमध्ये करू शकतो!
10
जे झाड चांगले फळ देत नाही त्याला कापण्यासाठी जसे एखादा मनुष्य त्याच्या मुळांवर घाव करतो तसे, देव तुम्हांला शिक्षा देण्यासाठी तयार आहे. तो अशा प्रत्येक झाडाला कापून टाकेल आणि त्यांना तो आग्निमध्ये टाकेल.”
11
“माझ्याविषयी म्हणाल तर, मी काही फार महत्त्वाचा नाही, कारण मी तर केवळ पाण्याने बाप्तिस्मा करतो. लोकांनी त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप केल्यानंतर मी ते करतो. परंतु लवकरच अतिशय सामर्थ्यशाली गोष्टी करणारा असा कोणीतरी एक येत आहे. तो माझ्यापेक्षा एवढा महान आहे की, मी त्याच्या पायतणांना उचलून चालण्यास देखील पात्र नाही.
तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील.
12
चांगल्या धान्यातून भूसा वेगळा करण्यासाठी, त्याचे उफणण्याचे सुप त्याने आपल्या हाती घेतले आहे. त्याने ज्या धान्याची मळणी केली आहे त्यामधून सर्व निरुपयोगी भूसा बाहेर काढून टाकण्यास तो तयार आहे. जसे शेतकरी आपल्या कोठारात गहू साठवतो तसेच तो नीतिमान लोकांना सुद्धा घरामध्ये ठेवील; परंतु जसे एखाद्याने न विझणाऱ्या आग्निमध्ये भुसा जाळावा तसे, तो दुष्ट लोकांना आग्निमध्ये जाळून टाकील.
येशूचा बाप्तिस्मा
13
त्या दिवसात, जेथे योहान होता तेथे, येशू गालील जिल्ह्यातून यार्देन नदीकडे गेला. योहानाने त्याचा बाप्तिस्मा करावा म्हणून त्याने तसे केले.
14
येशूने योहानाला त्याचा बाप्तिस्मा करण्यास सांगितले, तेव्हा योहानाने त्याला नकार दिला; तो म्हणाला, “तुच माझा बाप्तिस्मा करावा ह्याची मला गरज आहे! तू तर पापी नाहीस तरी देखील, तू माझ्याकडे का आला आहेस?”
15
परंतु येशू त्याला म्हणाला, “आताच माझा बाप्तिस्मा कर, कारण हे केल्याने आपण दोघेही देवाच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही करू.” मग योहान त्याला बाप्तिस्मा देण्यासाठी तयार झाला.
16
त्यानंतर, येशू लगेचच पाण्यातून वर आला. त्याचवेळेस, जणू काही आकाश उघडले गेले, आणि देवाचा आत्मा कबूतराच्या रुपाने खाली येतांना आणि आपल्यावर थांबतांना, येशूने पाहिला.
17
मग देव स्वर्गातून बोलला आणि म्हणाला, “हा माझा पुत्र आहे. मी त्याच्यावर प्रेम करतो, आणि मी त्याच्या विषयी फार संतुष्ट आहे.”