2
ज्ञानी लोक येशूबाळाच्या दर्शनास येतात
1
यहूदा प्रांतातील बेथलेहेम गावामध्ये येशूचा जन्म झाला तेव्हा महान हेरोद राजा तेथे राज्य करत होता. येशूच्या जन्मानंतर काही दिवसांनी, पूर्वेकडून फार दूरवरून ताऱ्यांचा अभ्यास करणारे काही पुरूष यरुशलेम शहरात आले.
2
त्यांनी लोकांनकडे विचारपूस केली, “तुम्हा यहूद्यांचा राजा होण्यासाठी ज्याचा जन्म झाला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला एक तारा पाहिला आहे तो हे दर्शवतो की तो जन्मास आला आहे, म्हणून आम्ही त्याला नमन करण्यासाठी आलो आहोत.”
3
ते लोक काय विचारपूस करत आहेत हे हेरोद राजाच्या कानी पडले, तेव्हा तो अतिशय चिंताग्रस्त झाला. यरूशलेमेमधील पुष्कळ लोक देखील चिंताग्रस्त झाले.
4
मग हेरोदाने सर्व मुख्य याजकांना आणि यहूदी नियम शास्त्राच्या शिक्षकांना एकत्र बोलावले. त्याने त्यांना विचारले, ‘संदेष्ट्याने भाकित केल्याप्रमाणे ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा होता.’
5
ते त्याला म्हणाले, “त्याचा जन्म येथेच यहूदा प्रांतातील, बेथलेहेम गावामध्ये होईल, कारण मिखा संदेष्ट्याने फार पूर्वी लिहिले आहे,
6
‘अहो यहूदाच्या भूमीवर बेथलेहेममध्ये राहणाऱ्यांनो, निश्चितच तुमचे शहर हे खूपच विशेष आहे, कारण तुमच्या शहरातून येणारा मनुष्य एक राज्यकर्ता असेल. तो इस्राएलामध्ये राहणाऱ्या माझ्या लोकांचे मार्गदर्शन करील.’”
7
मग हेरोद राजाने ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या पुरूषांना गुप्तपणे बोलावले. त्याने त्यांना विचारले अगदी प्रथम केंव्हा तो तारा प्रकट झाला.
8
मग तो त्यांना म्हणाला, “बेथलेहेम गावास जा आणि ते बालक कोठे आहे अशी सर्वत्र विचारपूस करा. तो तुम्हांला सापडेल तेव्हा, माझ्याकडे परत येऊन मला सांगा, म्हणजे मी स्वतःदेखील तेथे जाईन, आणि त्याची उपासना करीन.”
9
मग ते पुरूष राजा सोबत बोलल्यावर बेथलेहेम गावाकडे गेले. ते पूर्वेकडील देशात असतांना त्यांनी जो तारा पाहिला होता, तो ज्या घरात ते बालक होते त्या घरावर थांबेपर्यंत त्यांच्या पुढे-पुढे चालत राहिला, याचे त्यांना आश्चर्य वाटले.
10
त्यांनी तो तारा पाहिला, तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते त्याच्या मागे-मागे चालत राहिले.
11
त्यांना ते घर सापडल्यावर, त्यांनी त्यात प्रवेश केला, आणि बालक व त्याची आई, मरीया यांना पाहिले. त्यांनी खाली वाकून त्याला नमन केले. मग त्यांनी आपल्या धनाच्या पेट्या उघडल्या आणि सोने, सुगंधी धूप, आणि गंधरस त्याला अर्पण केले.
12
मग देवाने त्यांना स्वप्नामध्ये असा इशारा दिला की हेरोद राजाकडे परत जाऊ नका. म्हणून ते त्यांच्या देशाकडे जाण्यासाठी निघाले, परंतु आलेल्या मार्गाने परत न जाता, त्या ऐवजी ते दुसऱ्या मार्गाने गेले.
मिसर देशास पलायन
13
ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी बेथलेहेम गाव सोडल्यानंतर, देवापासून आलेला एक दूत योसेफाला स्वप्नात प्रकट झाला. तो म्हणाला, “ऊठ, बाळाला आणि त्याच्या आईला घे, आणि मिसर देशास पळून जा. जो पर्यंत मी असे सांगत नाही की, आता तुला तो देश सोडायला हवा तोपर्यंत तेथेच राहा, कारण हेरोद राजा त्याच्या सैनिकांना पाठवण्याच्या बेतात आहे जेणेकरून त्यांनी येऊन बाळाला शोधून मारून टाकावे.”
14
म्हणून योसेफ त्याच रात्री उठला; त्याने बाळाला व त्याच्या आईला बरोबर घेतले, आणि ते मिसर देशास पळून गेले.
15
हेरोद राजाचा मृत्यु होईपर्यंत ते तेथे राहिले, मग ते मिसरामधून निघाले. देवाने होशेय संदेष्ट्याला लिहिण्यास सांगितले होते ते खरे ठरावे, ते ह्या प्रकारे,
“मी माझ्या पुत्राला मिसरामधून बोलावले आहे.”
बेथलेहेम येथील मुलांची कत्तल
16
हेरोद राजाचा मृत्यु होण्या अगोदर, त्याला हे कळून आले की त्या मनुष्यांनी त्याला फसवले आहे, आणि ह्याचा त्याला राग आला. येशू अजूनही बेथलेहेम गावामध्येच जवळपास आहे असे त्याला वाटले होते म्हणून, हेरोदाने सर्व दोन वर्ष वयाच्या आणि त्याहून कमी वयाच्या मुलांना जीवे मारण्यासाठी सैनिकांना पाठवले. ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या मनुष्यांना तारा पहिल्यांदा केव्हा दिसला हे त्यांचे त्याला सांगण्यावरून, मुल किती वर्षांचे असेल याचा हेरोदाने हिशोब केला.
17
हेरोदाने असे केले तेव्हा, यिर्मया संदेष्ट्याने फार काळापूर्वी बेथलेहेमा जवळील रामा शहराविषयी लिहून ठेवले होते, ते खरे ठरले:
18
रामा येथील स्त्रिया मोठ्याने ओरडत व रडत आहे.
ह्या स्त्रियांची पूर्वज राहेल, तिच्या मृत झालेल्या लेकरांसाठी रडत होती.
लोक तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते तसे करू शकत नाहीत कारण, सर्व मुले ठार झाली आहेत.
मिसराहून परतणे
19
हेरोद राज्याच्या मृत्युनंतर देखील योसेफ आणि त्याचा परिवार मिसरातच राहत असता, देवाने पाठवलेला एक देवदूत योसेफाला स्वप्नात प्रकट झाला.
20
तो योसेफास म्हणाला, “ऊठ आणि बाळाला व त्याच्या आईला सोबत घेऊन परत इस्राएल देशात जाऊन राहा, कारण मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे मरण पावले आहेत.”
21
म्हणून योसेफाने मुलाला व त्याच्या आईला सोबत घेतले आणि ते इस्राएलामध्ये जाण्यासाठी निघाले.
22
अर्खेलाव हा त्याचा पिता हेरोद राजाच्या जागेवर यहूदा प्रांतात राज्य करत आहे हे योसेफाने ऐकले, तेव्हा तेथे जाण्याची त्याला भीती वाटू लागली. तेव्हा पुढे त्याने काय करावे याविषयीच्या सुचना देवाने त्याला स्वप्नामध्ये दिल्या, म्हणून योसेफ, मरिया, आणि त्यांचे बालक गालील प्रांतास परतले.
23
ते नासरेथ गावी राहण्यासाठी गेले. परिणामी फार काळापूर्वी संदेष्टा जे काही बोलला होता की: ‘तो नासरेथाचा आहे असे लोक म्हणतील’ ते खरे ठरावे.