4
अरण्यात येशूची परिक्षा

1 मग सैतानाकडून येशूची परिक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्याला अरण्यात नेले. 2 चाळीस दिवस आणि रात्र, त्याने उपास केल्यामुळे त्याला भूक लागली. 3 परिक्षा घेणारा, सैतान त्याच्याकडे आला, आणि त्याला म्हणाला, “जर तू खरोखर देवाचा पुत्र आहेस, तर ह्या दगडांना अशी आज्ञा दे की ते तुझ्यासाठी भाकरी बनतील!” 4 परंतु येशू त्याला म्हणाला, “नाही! मी हे करणार नाही, कारण देवाने शास्त्रलेखात सांगितले आहे, ‘लोकांना खरोखर जीवन जगण्यासाठी केवळ अन्नच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक काहीतरी लागते; देवाने बोललेले प्रत्येक शब्द त्यांनी ऐकावे.’”

5 नंतर देवाला विशेष असलेल्या यरुशलेम शहरात, सैतान येशूला घेऊन गेला. त्याने त्याला मंदिराच्या सर्वात उंच ठिकाणी उभे केले. 6 आणि त्याला म्हणाला, “जर तू खरोखरच देवाचा पुत्र आहेस, तर खाली जमिनीवर उडी टाक. अर्थातच, तुला दुखापत होणार नाही, कारण देवाने शास्त्रलेखात असे सांगितले आहे,
‘तुला रक्षण करण्यासाठी देव त्याच्या देवदूतांना आज्ञा देईल.
तू पडू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील.
तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला दूर ठेवतील.’”

7 परंतु येशू म्हणाला, “नाही! मी खाली उडी घेणार नाही, कारण देवाने शास्त्रात हे देखील म्हटले आहे, ‘तुझा देव कसा आहे हे सिद्ध करण्यास त्याला भाग पाडण्याचा प्रयत्न करू नको.’” 8 मग सैतान त्याला एका डोंगरावरील अतिशय उंच ठिकाणी घेऊन गेला. तेथे त्याने त्याला जगातील सर्व राष्ट्रे आणि त्या राष्ट्रांच्या भव्य गोष्टी दाखवल्या. 9 मग तो त्याला म्हणाला, “जर तू मला नमन करून माझी उपासना केलीस तर मी तुला या सर्व राष्ट्रांवर राज्य करू देईन आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या भव्य गोष्टी तुला देईन.”

10 परंतु येशू त्याला म्हणाला, “नाही, मी तुझी उपासना करणार नाही, तर आता सैताना, निघून जा! ‘देव शास्त्रलेखात म्हणतो, केवळ तुझा देव प्रभू ह्यालाच तू नमन करावे, आणि तू केवळ त्याचीच उपासना करावी!’” 11 मग सैतान तेथून निघून गेला, आणि त्याच घटकेस, देवदूत येऊन येशूची काळजी घेऊ लागले.
गालीलातील कफर्णहूम येथे येशू जाऊन राहतो

12 येशू यहूदा प्रांतात होता, तेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांनी त्याच्याकडे येऊन त्याला सांगितले की हेरोद राजाने योहानाला तुरूंगात टाकले आहे. मग येशू गालील जिल्ह्यातील, नासरेथ गावात परतला. 13 नंतर त्याने नासरेथ सोडले व कफर्णहूम शहरामध्ये राहण्यास गेला. कफर्णहूम हे गालील समुद्राजवळ जो पुर्वी जबुलून आणि नफताली वंशाचा प्रदेश होता तेथे स्थित आहे.

14 तो तेथे गेला जेणेकरून यशया संदेष्ट्याने फार काळापूर्वी लिहिलेले शब्द खरे ठरावे:
15 जबुलून आणि नफताली यांचे प्रदेश,
समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून, यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या भागात असलेले प्रदेश,
गालीलातील ते प्रदेश, जे पुष्कळ परराष्ट्रीयांचे घर आहे!
16 असे लोक अंधारातच असलेल्या लोकांप्रमाणे, देवाला ओळखत नाहीत,
परंतु ते सत्य शिकतील, जणू काय तेजस्वी प्रकाश त्यांच्यावर प्रकाशला आहे.
होय, त्यांना मरणाची अतिशय भीती वाटली,
परंतु त्यांच्यावर अति तेजस्वी प्रकाश चमकला आहे!”

17 त्याच दिवसात, येशू कफर्णहूम शहरात असता, त्याने लोकांना उपदेश करण्यास आरंभ केला, “देव लवकरच स्वतःला एक राजा म्हणून प्रकट करणार आहे, जेव्हा तो राज्य करेल तेव्हा तो तुमचा न्याय करील. म्हणून पाप करणे थांबवा!”
प्रथमशिष्यांना पाचारण

18 एके दिवशी येशू गालील समुद्राजवळून चालत असता, शिमोन, ज्याला नंतर पेत्र म्हणण्यात आले, त्याला आणि त्याचा धाकटा भाऊ अंद्रिया, ह्या दोघां पुरूषांना त्याने पाहिले. ते आपली मासे पकडण्याची जाळी पाण्यात टाकत होते कारण ते मासे पकडून आणि त्यांना विकून पैसे मिळवणारे होते. 19 येशू त्यांना म्हणाला, “माझ्या सोबत या आणि माझे शिष्य होण्याकरीता लोकांना कसे एकत्र करावे हे मी तुम्हांला शिकवीन. जसे तुम्ही मासे पकडले अगदी त्यासारखेच हे असेल.” 20 लागलेच ते करत असलेले काम त्यांनी टाकून दिले आणि त्याच्या बरोबर निघून गेले.

21 त्यापैकी तीन लोक तेथून निघाले तेव्हा, येशूने इतर दोन पुरूष म्हणजे, याकोब आणि याकोबाचा धाकटा भाऊ योहान, ह्यांना पाहिले. ते दोघे आपला पिता जब्दी, ह्याच्यासोबत त्यांच्या नावेमध्ये, मासे पकडण्याची जाळी नीट करत होते. त्यांनी आपले काम सोडून देऊन येशूच्या मागे यावे असे त्याने त्यांना सांगितले. 22 लागलेच त्यांनी आपल्या वडिलांसह आपली नाव देखील सोडली आणि येशूच्या मागे गेले.
गालीलातील फेरी व कार्य

23 येशू या चार पुरूषांना घेऊन संपूर्ण गालील जिल्ह्यातून फिरला. तो सभास्थानामध्ये लोकांना शिक्षण देत असे. देव स्वतःला राजा म्हणून कसे प्रकट करणार आहे ह्याविषयीच्या शुभवर्तमानाचा उपदेश तो लोकांना करत असे. जे लोक आजारी होते अशांना देखील तो बरे करत असे. 24 सूरिया जिल्ह्याच्या इतर भागात राहणाऱ्या लोकांनी तो करत असलेल्या कार्याविषयी ऐकले, तेव्हा त्यांनी जे लोक आजारातून जात आहेत, त्यांना आणि असे लोक जे अनेक रोगांपासून त्रस्त आहेत त्यांना, ज्या लोकांना तीव्र वेदना आहेत त्यांना, जे लोक सैतानाच्या ताब्यात आहेत त्यांना, ज्यांना अपस्मार चा आजार आहे अशांना, आणि ज्यांना अर्धांगवायू झाला आहे. अशा सर्व लोकांना त्याच्याकडे आणिले. आणि येशूने त्यांना बरे केले. 25 मग मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर चालू लागला. ते लोक गालीलातून, दहा गावातून, यरुशलेम शहरातून, यहूदा प्रांतातील इतर भागातून, आणि यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या ठिकाणातून आलेले होते.