15
मानवी संप्रदाय व येशूची शिकवण
1
तेव्हा यरुशलेमेहून काही परूशी आणि यहूदी नियम शिकवणारे पुरूष येशूसोबत बोलण्यासाठी आले. व ते म्हणाले,
2
“तुझे शिष्य आमच्या पूर्वजांच्या परंपरांना मोडतात असे आम्ही पाहिले आहे! कारण ते जेवण करण्यापूर्वी हात धुण्याचा योग्य विधी करत नाहीत!”
3
येशूने त्यांना उत्तर दिले, “आणि तुम्ही ही तुमच्या पूर्वजांनी जे शिकवले ते पाळता यावे म्हणून देवाने दिलेल्या आज्ञा पाळण्यास नकार देता असे मी पाहतो!
4
देवाने तर ह्या दोन आज्ञा दिल्या आहेत: ‘आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा सन्मान कर,’ आणि ‘जे लोक आपल्या आईबद्दल किंवा आपल्या वडिलांबद्दल वाईट बोलतात त्यास अवश्य जीवे मारावे’.
5
परंतु तुम्ही तर लोकांना सांगता की, ‘तू तुझ्या आईला किंवा वडिलांना असे म्हणू शकतो की, “तुमची मदत होण्यासाठी जे काही मला तुम्हांला देणे होते ते आता मी देवाला अर्पण करण्याचे वचन दिले आहे.”’
6
आता आपल्या आईवडिलांना काहीएक देण्याची गरज नाही असा विचार तुम्ही करता, तेव्हा याप्रकारे देवाने आज्ञापिलेल्या आज्ञांना तुम्ही दुर्लक्षीत करता जेणेकरून तुमच्या पूर्वजांनी शिकवलेले तुम्हांला पाळता यावे म्हणून तुम्ही ते करता!
7
तुम्ही केवळ चांगले असल्याचे ढोंग करता! यशयाने देखील तुमच्या पूर्वजांबद्दल असलेले देवाचे विचार बोलला तेव्हा त्यानेही तुम्हांविषयीचे सत्य सांगितले आहे.
8
‘ते लोक माझा सन्मान करतात असे म्हणतात, पण ते माझी काळजी करत नाहीत,’
9
त्यांनी माझी उपासना करणे हे त्यांच्यासाठी व्यर्थ आहे, कारण जणू काय मीच त्यांना आज्ञा दिली आहे असे मनुष्याचे विचार ते शिकवितात.’”
10
मग येशूने जमावाला परत पुन्हा एकदा त्याच्याजवळ बोलाविले. तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला जे सांगणार आहे ते नीट ऐका आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.
11
एखादा व्यक्ती खाण्यासाठी आपल्या तोंडात काही घालतो तर देव त्या कारणाने त्याला नाकारत नाही. त्याऐवजी, लोक जे बोलतात—म्हणजे त्यांच्या मुखातून बाहेर आलेले शब्द—देवाने त्यांना स्वीकारू नये म्हणून कारणीभूत ठरतात.”
12
त्यानंतर शिष्य येशूजवळ गेले आणि म्हणाले, “तुझे बोलणे परुश्यांनी ऐकले आणि तुझ्यावर ते रागावले हे तुला ठाऊक आहे काय?”
13
तेव्हा येशूने त्यांना ही बोधकथा सांगितली. “जसा एक शेतकरी जे रोपटे त्यांने लावले नाही त्या रोपट्याला तो त्याने लावलेल्या रोपट्यांमधून मुळासकट वर उपटून काढतो अगदी त्याचसारखे माझा स्वर्गातील पिता देखील जे तो बोललेला आहे आणि त्याच्या बोलण्याच्या विरुद्ध जे गोष्टी शिकवतात त्या सर्वांना तो उपटून टाकेल.
14
परुश्यांकडे कोणतेही लक्ष देवू नका. कारण आंधळे मार्गदर्शक आंधळ्या लोकांना कुठे बघून त्यांनी चालले पाहिजे अशी मदत ते करू शकत नाहीत. त्याऐवजी, ते सर्व एकाच खड्डयात पडतील. अगदी त्याचसारखे परूशी लोक देवाची आज्ञा काय आहे हे लोकांना समजण्यास मदत करत नाहीत.”
15
पेत्र येशूला म्हणाला, “एका व्यक्तीने काय खावे त्याबद्दलची बोधकथा आम्हाला स्पष्ट करून सांग.”
16
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी शिकविलेले तुम्हाला खात्रीने समजायलाच हवे, पण तुम्ही ते समजून घेत नाहीत म्हणून मी निराश झालो आहे.
17
लोक जे काहीपण अन्न खातात ते त्यांच्या पोटात जाते, आणि नंतर राहिलेले ते त्यांच्या शरीरातून बाहेर पडते. लोक जे खातात त्यामुळे देवाने त्यांना स्वीकारू नये म्हणून कारणीभूत होत नाही.
18
त्याऐवजी, देवाने एखाद्या व्यक्तीला नाकरण्याचे कारण म्हणजे त्याच्या तोंडातून बोलले जाणारे वाईट शब्द होय, कारण तो व्यक्ती त्याच्या मनामध्ये वाईट विचार करत असतो आणि त्यामुळे वाईट तेच बाहेर पडते.
19
हे असे ह्यासाठी आहे कारण लोकांचे अंतर्याम हे त्यांना, लोकांचा खून करणे, व्यभिचार करणे, इतर लैगिंक पाप करणे, चोरी करणे, खोट्या साक्षी, इतराबद्दंल वाईट बोलणे ह्या वाईट गोष्टी विचार करण्यास भाग पाडते.
20
देवाने लोकांना त्याच्यासाठी स्वीकारू नये म्हणून ही कृत्ये कारणीभूत ठरतात. परंतु ना धुतलेल्या हाताने खाणे हे देवाने लोकांना नाकारण्याचे कारण होऊ शकत नाही.”
एक परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी
21
त्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना सोबत घेतले आणि गालील जिल्ह्यातून निघून ते सर्व जेथे सोर आणि सिदोन शहरे आहेत त्या दिशेने गेले आणि तेथील प्रातांत पोहचले.
22
तेव्हा त्या प्रातांत राहणारी कनानी नावाच्या लोकांच्या गटातून आलेली एक स्त्री येशूकडे आली. ती सारखी ओरडत होती, “प्रभूजी, तुम्ही दावीद राजाचे पुत्र आहात, तुम्ही मशीहा आहात! माझ्यावर आणि माझ्या मुलीवर दया करा! ती खूप दुःख सोसीत आहे कारण तिला एका भूताने वश केले आहे.”
23
परंतु तरीही येशूने तिला उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला म्हटले, “तिला जाण्यास सांगा कारण ती आपण जसे जात राहू तसे ती आपल्या मागे येऊन ओरडत राहून आपल्याला त्रास देत राहील.”
24
येशूने तिला म्हटले, “देवाने मला केवळ इस्त्राएलाच्या लोकांकरता पाठवलेले आहे, कारण ते मार्गांपासून भटकलेल्या मेंढरासारखे आहेत. स्वर्ग कसा मिळवावा हे त्यांना ठाऊक नाही.”
25
परंतु ती स्त्री येशूच्या आधिक जवळ आली आणि त्याच्यासमोर येऊन आपल्या गुडघ्यांवर जाऊन तिने याचना केली, “प्रभूजी, माझी मदत करा!”
26
मग त्याने तिला सांगितले, “एखाद्याने आपल्या मुलासाठी तयार केलेले जेवण घेऊन ते घरातील कुत्र्यांच्या पिल्लांना टाकणे हे योग्य नाही.”
27
परंतु त्या स्त्रीने उत्तर दिले, “प्रभूजी, तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे, पण तरीही कुत्र्याची पिल्ले आपला धनी ज्या स्वतःच्या मेजावर बसतो आणि जेवतो, तेव्हा फरशीवर पडलेला चुरा खातात!”
28
तेव्हा येशू तिला म्हणाला, “बाई, माझ्यावर तू दृढतेने विश्वास ठेवला, त्यामुळे मी तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या मुलीस बरे करीन!” आणि त्याचक्षणी ते भूत तिच्यातून निघून गेले, व ती बरी झाली.
29
मग येशू आणि त्याचे शिष्य त्या भागातून निघून गेले, व गालील समुद्राजवळ परत आले. मग येशू तेथील जवळचा डोंगर चढून गेला आणि लोकांना शिकवण्यासाठी बसला.
30
मग मोठा लोकसमुदाय पुढील दोन दिवसापर्यंत त्याच्याजवळ येतच राहिला आणि लंगडे, असहाय्य, आणि आंधळे लोक, जे बोलू शकत नव्हते त्यांना, आणि अनेक इतर जे विविध आजाराने त्रस्त होते त्यांना आणिले. येशूने त्यांना बरे करावे म्हणून ते त्याच्यासमोर त्यांना ठेवत होते. आणि त्यांना त्याने बरे केले.
31
लोकसमुदायाने जे लोक बोलू शकत नव्हते, अशा असहाय्य लोकांना, लंगड्या लोकांना, आणि आंधळ्या लोकांना बरे करतांना त्याला पाहिले आणि ते सर्व फार आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, “इस्त्राएलात आम्हांवर राज्य करणाऱ्या देवाची स्तुती असो!”
चार हजारांना भोजन
32
मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावले आणि म्हटले, “हा लोकसमुदाय गेल्या तीन दिवसांपासून माझ्याबरोबर आहे आणि खाण्यासाठी काहीही उरले नाही. म्हणून त्याबद्दल मला दुःख आहे. ते उपाशी असतांना त्यांना पाठवावे अशी माझी इच्छा नाही, कारण जर मी तसे केले, तर घरी जातांना रस्त्यामधे ते कदाचित चक्कर येऊनही पडतील.”
33
शिष्यांनी त्याला म्हटले, “या ठिकाणी कोणीही राहत नाही, आणि एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला जेवण खाऊ घालण्यापुरते अन्न आम्ही शक्यतो मिळवू शकणार नाही!”
34
येशूने शिष्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती लहान भाकरी आहेत?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्हांजवळ सात लहान भाकरी आणि थोडे भाजलेले मासे आहेत.”
35
तेव्हा येशूने लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले.
36
त्याने त्या सात भाकरी व मासे घेतले. त्यानंतर त्यांने त्यांच्यासाठी देवाचे आभार मानिले, त्याने त्या भाकरींना तोडून त्याचे तुकडे केले व ते आपल्या शिष्यांना देत गेला. तेव्हा शिष्यही ते लोकसमुदायास देत गेले.
37-38
ते सर्व लोक जेवले आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी ते भरपूर होते, कारण येशूने चमत्कारिक रितीने अन्न वाढविले होते. तेथे चार हजार पुरूष होते जे जेवले होते, स्त्री व लहान मुलेही जेवले पण कोणीही त्यांना मोजले नाही. नंतर शिष्यांनी तेथे उरलेल्या भाकरीच्या तुकड्यांना गोळा केले, आणि त्यांनी मोठ्या अशा सात टोपल्या भरून सोबत घेऊन गेले.
39
येशूने लोकसमुदायाला पाठवून दिल्यानंतर, त्याला आणि शिष्यांना एक तारू मिळाले त्या तारवात बसून सरोवरच्या काठी असलेल्या मगदानाच्या प्रदेशात ते गेले.