14
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मुत्यू

1 येशू चमत्कार करत आहेत याविषयीची वार्ता हेरोद अंतीपस ह्या शासकाकडे पोहचली. 2 त्याने आपल्या सेवकांना म्हटले, “हा नक्कीच बाप्तिस्मा करणारा योहान असला पाहिजे. जो मेलेल्यांमधून पुन्हा जिवंत झाला असावा, आणि म्हणूनच त्याच्याकडे चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे.”

3-4 हेरोद असा विचार करत होता ह्याच्या मागे हे कारण होते. हेरोदाने हेरोदिया सोबत विवाह केला होता, ती त्याचा भाऊ फिलीप्प ह्याची बायको होती, आणि फिलिप्प जिवंत असतांनाच त्याने असे केले होते. म्हणून योहान त्याला असे म्हणत होता, “तू जे काही केले आहे ते देवाच्या नियमाच्या विरोधात आहे!” तेव्हा, हेरोदियाला खूश करण्यासाठी, हेरोदाने आपल्या सैनिकांना सांगितले की योहानाला कैदेत टाका. त्यांनी त्याला साखळदंडांनी बांधले आणि तुरूंगामध्ये ठेवले. 5 आपल्या माणसांना सांगून योहानाला ठार करावे अशी हेरोदाची इच्छा होती, परंतु तो सर्वसाधारण लोकांना घाबरत होता, कारण योहान हा देवासाठी बोलणारा एक महान संदेष्टा आहे असा त्यांचा विश्वास होता.

6 एके दिवशी, हेरोदाने त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक मोठी मेजवानी केली होती, आणि त्याच्या पाहुण्यासमोर हेरोदीयाच्या मुलीने नाच करून त्यांना खूश केले. तिचे नृत्य पाहून हेरोदालाही अतिशय आनंद झाला, 7 म्हणून त्याने तिला असे वचन दिले की ती जे काही मागेल ते तो तिला देईल, आणि त्यांने हे वचन दिले आहे यासाठी त्याने देवाला साक्षीदार म्हणून राहण्याची विनंती केली.

8 मग हेरोदियेची मुलगी निघाली आणि तिच्या आईला तिने म्हटले की मी काय मागावे. तिच्या आईने तिला सांगितले की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिर आणून द्यावे असे तू माग. मग ती मुलगी पुन्हा परत गेली आणि हेरोदाला असे म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तू कलम करावे आणि एका तबकात घालून तो खरोखर मेला आहे हे दाखवण्यासाठी माझ्यासमोर घेऊन यावे!” 9 हिरोदीयाच्या मुलीने जे काही मागितले ते मी तिला देईन असे अभिवचन दिल्याचे आता हेरोदाला खूप पस्तावा झाला. परंतु ते वचन देतांना त्याने देवाला साक्षीदार म्हणून ठेवल्यामुळे, आणि त्याच्या मेजवानीसाठी जमलेल्या सर्व पाहुण्यासमोर त्याने ते बोलले होते, म्हणून त्याने जे काही म्हटले आहे ते त्याला करावेच लागेल अशी त्याला जाणिव झाली. म्हणून त्यांनी आपल्या सेवकांना आज्ञा दिली की तिच्या इच्छेप्रमाणे करा.

10 त्याने सैनिकांना तुरूंगात जाण्याची आज्ञा केली आणि योहानाचे शीर कापावे म्हणून सांगितले. 11 त्यांनी तसे केले, आणि एका तबकामध्ये योहानाचे डोके ठेवून ते त्या मुलीकडे घेऊन आले. मग त्या मुलीने ते शिर घेतले आणि आपल्या आईकडे आणले. 12 त्यानंतर योहानाचे शिष्य तुरूंगात गेले, त्यांनी योहानाचे शरीर घेतले आणि ते पुरले. आणि मग ते तेथून गेले आणि येशूला जाऊन त्यांनी ह्या सर्व घडलेल्या घटना सांगितल्या.
पाच हजार लोकांना भोजन

13 येशूने ही बातमी ऐकल्यानंतर, त्याने आपल्या शिष्यांना आपल्या सोबत घेतले आणि गालील समुद्रात एका नावेने प्रवास करत जिथे कोणीही राहत नव्हते अशा ठिकाणी तो गेला.

मग ते कोठे गेले आहे हे लोक समुदायाने ऐकले, तेव्हा त्यांनीही आपली गावे सोडली आणि ते त्यांच्या मागोमाग किनाऱ्यांनी पाई पाई चालत यांच्याकडे गेले.

14 येशू किनाऱ्यावर आला, तेव्हा त्याने लोकांचा मोठा जमाव त्याची वाट पाहत आहे असे त्याने पाहिले. त्याला त्यांचा फार कळवळा आला, आणि त्यांच्यामध्ये जे लोक आजारी होते त्या सर्वांना त्यांने पूर्णपणे बरे केले.

15 त्या दिवशी जवळपास संध्याकाळ झाली होती, तेव्हा शिष्य येशूजवळ आले आणि म्हणाले, “हे एक ठिकाण ओसाड आहे आणि येथे कोणतीही वस्ती नाही, आणि आता बराच उशीर झाला आहे. म्हणून तू आता ह्या लोकांना जवळपासच्या गावांमध्ये जावे आणि स्वतःसाठी अन्न विकत घ्यावे असे सांगून त्यांना पाठवून दे.”

16 परंतु येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “अन्न विकत घेण्यासाठी त्यांना येथून जाण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, तुम्ही स्वतःच त्यांना खाण्यासाठी काहीतरी द्या!” 17 शिष्यांनी त्याला म्हटले, “परंतु आमच्याकडे तर केवळ पाच भाकरी आणि दोन बनवलेले मासे आहेत!” 18 तो म्हणाला, “ते माझ्याकडे घेऊन या!”

19 जो लोकसमुदाय एकत्र आला होता त्या लोक समुदायाला येशूने तेथील गवतावर बसण्यास सांगितले. मग त्याने ते दोन मासे आणि त्या पाच भाकरी आपल्या हातात घेतल्या. त्याने आपली दृष्टी स्वर्गाकडे केली, आणि त्या अन्नाबद्दल देवाचे आभार मानले, आणि मग त्याने त्या भाकरी तुकड्यांमध्ये मोडल्या. मग त्याने ते तुकडे आपल्या शिष्यांच्या हातात दिले, आणि त्यांनी ते लोकसमुदायांमध्ये वाटले. 20 तेथे जमलेल्या सर्वांनी तृप्त होईपर्यंत जेवण केले. आणि त्यानंतर त्यांच्यातल्या काही लोकांनी उरलेले तुकडे गोळा केले तर त्यांच्या बारा टोपल्या भरल्या. 21 त्यावेळी सुमारे पाच हजार पुरूषांनी जेवण केले, आणि त्यामध्ये स्त्रियांची आणि मुलांची गणना केली नव्हती!
येशू समुद्रावरून चालतो

22 ही घटना घडल्यानंतर लगेचच, येशूने आपल्या शिष्यांना नावेमध्ये बसण्यास आणि त्याच्या अगोदर गालील समुद्राच्या पलीकडच्या बाजूस जाण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात, तो लोकांना त्यांच्या घरी लावून देणार होता. म्हणजेच तो लोकांचा निरोप घेणार होता. 23 त्याने त्या लोकांच्या गर्दीला निरोप दिल्यानंतर, तो डोंगरावर चढला तेथे तो स्वतःसाठी प्रार्थना करणार होता. तेव्हा संध्याकाळ झाली असता तो तेथे अद्यापही एकटाच होता. 24 इतक्या वेळपर्यंत शिष्य किनाऱ्यापासून वल्लवत बरेच अंतर पार करून गेले होते. शिष्य वल्लवण्याचा प्रयत्न करत असतांना; वारा त्यांच्या विरुद्ध दिशेला जोरदार वाहत होता. त्या वाऱ्यामुळे समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा उसळल्या आणि त्या नावेला मागेपुढे पाण्यामध्ये हेलकावे खावे लागले.

25 मग येशू डोंगरावरून उतरून खाली पाण्याजवळ आला, मोठ्या पहाटे तीन वाजेपासून ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान तो पाण्यावर चालत नावेकडे आला. 26 शिष्यांनी त्याला पाण्‍यावर चालतांना पाहीले, तेव्हा तो एक भूत आहे असे त्यांना वाटले. ते अतिशय घाबरून गेले, आणि ते भीतीने फार मोठ्याने ओरडू लागले. 27 लगेचच येशू त्यांना म्हणाला, “घाबरू नका! हा मी आहे. भीती बाळगू नका!”

28 पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभू, हा तू आहेस, तर मी देखील पाण्यावरुन चालत तुझ्याकडे यावे असे मला सांग!” 29 येशू म्हणाला, “ये!” म्हणून पेत्र नावेतून बाहेर निघाला आणि तो पाण्यावरून चालत जात येशूकडे जाऊ लागला. 30 परंतु त्याचे लक्ष जोराने वाहणाऱ्या वाऱ्याकडे गेले, तेव्हा तो घाबरला. आणि तो पाण्यामध्ये बुडू लागला मग तो मोठ्याने ओरडला, “प्रभू, मला वाचवा!”

31 येशूने लगेच आपला हात पुढे केला आणि पेत्राला धरले. येशू त्याला म्हणाला, “तू माझ्या सामर्थ्यावर अगदी थोडासाच विश्वास ठेवतो! मी तुला बुडण्यापासून वाचवणार नाही असा तू विचार का केला?” 32 मग येशू आणि पेत्र दोघेही नावेमध्ये चढले आणि वारा अचानक आपोआपच जोराने वाहण्याचा बंद झाला. 33 नावेमध्ये जे सर्व शिष्य होते त्यांनी येशूसमोर उघडे पडून नमन केले आणि ते त्याला म्हणाले, “तू खरोखर देवाचा पुत्र आहेस!”

34 त्या नावेतून समुद्रात ते आणखी पुढे गेले, तेव्हा गनेसरेत नावाच्या गावाच्या शेजारील किनाऱ्यावर ते पोहोंचले. 35 येशूला त्या प्रदेशातील पुरूषांनी ओळखले, आणि येशू त्यांच्या प्रदेशात आला आहे हे त्या संपूर्ण भागात राहणाऱ्या इतरांना माहिती द्यावी म्हणून त्यांनी काही लोकांना पाठवले. मग त्या प्रदेशातील लोकांनी त्यांच्यामधील आजारी लोकांना त्याच्याकडे आणले. 36 त्यांनी त्याला स्पर्श करू द्यावा किंवा त्याने घातलेल्या अंगरख्याच्या काठाला तरी निदान स्पर्श करू द्यावा जेणेकरून ते बरे होतील म्हणून ते आजारी लोक येशूला विनंती करत राहिले. त्याला किंवा त्याच्या वस्त्राला स्पर्श करणारा प्रत्येक व्यक्ती बरा झाला.