13
पेरणी करणाऱ्याचा दृष्टांन्त

1 मग त्याच दिवशी येशूने, आपल्या शिष्यांसोबत, ज्या घरात तो शिक्षण देत होता ते घर सोडले आणि तेथून गालील समुद्राच्या किनार्‍यावर गेला. तेथे तो खाली बसला, 2 आणि त्याचे शिक्षण ऐकण्यासाठी फार मोठा लोकांचा समुदाय त्याच्याजवळ गोळा झाला. थोडी मोकळी जागा मिळावी म्हणून तो एका नावेत चढला आणि तिच्यात बसून त्याने त्यांना शिक्षण दिले. लोकांची गर्दी समुद्र किनाऱ्यावर उभी राहून त्याचे शिक्षण ऐकू लागली.

3 त्याने त्यांना असंख्य बोधकथेचा उपयोग करून शिक्षण दिले. तो म्हणाला, “ऐका! एक मनुष्य आपल्या शेतामध्ये बी पेरण्यासाठी गेला. 4 जेव्हा तो जमिनीवर बी पेरत होता, तेव्हा त्यापैकी काही बी वाटेवर पडले. परंतु काही पक्षी आले आणि त्यांनी ते बी खाऊन टाकले. 5 काही बी अशा जमिनीवर पडले जेथे फारशी माती नव्हती आणि खडकाळ जागा होती. त्या बीयांना लवकर अंकूर फुटले, कारण सुर्याने त्या उथळ मातीला लवकरच तापवले त्यामुळे असे घडले. 6 परंतु जेव्हा ती छोटी रोपटे वाढली, तेव्हा ती सूर्यप्रकाशात अतिशय तापली आणि त्यामुळे ती सुकून गेली कारण त्यांची मूळे मातीमध्ये खोलवर रुजलेली नव्हती.

7 काही बी अशा जमिनीवर पडले जेथे काटेरी झुडपे होती. ती काटेरी झुडपे त्या लहान रोपट्या सोबत वाढली, आणि त्यांनी त्यांना कवटाळले. 8 परंतु काही बी चांगल्या जमिनीवर पडले, आणि ती झाडे वाढली आणि त्यांनी भरपूर पीक दिले. काही रोपट्यांनी शंभर पट इतके पीक दिले. काही ठिकाणी त्यांनी साठ पट इतके पीक दिले आणि काही ठिकाणी तीस पटीपर्यंत पीक आले. 9 जर तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल, तर मी जे काही बोललो त्याचा लक्षपूर्वक विचार केला पाहिजे.”
दृष्टांन्ताचा उपयोग

10 मग शिष्य येशूकडे नंतर परत आले आणि त्यांनी त्याला विचारले, “तू गर्दीमध्ये लोकांशी बोलत असतो तेव्हा बोधकथांचा उपयोग का करतो?” 11 त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाने या अगोदर कोणाला जे प्रगट केले नाही ते त्याने तुम्हावर प्रकट केले आहे, म्हणजेच तो स्वतःला कशा पद्धतीने राजा म्हणून प्रकट करणार आहे हे त्याने तुम्हाला दाखवले आहे. परंतु त्याने ह्या गोष्टी इतर लोकांवर प्रकट केलेल्या नाहीत. 12 मी काय बोलतो याचा जो कोणी विचार करणार आणि ते समजून घेईल, तर परमेश्वर त्यांना त्या गोष्टी अधिक समजण्यास सक्षम करेल. परंतु मी जे बोलत आहे त्याविषयी लक्षपूर्वक विचार करण्याचा जे प्रयत्न करणार नाहीत ते त्याही गोष्टी विसरतील ज्या त्यांना अगोदर पासूनच ठाऊक आहेत.

13 आणि म्हणूनच लोकांशी बोलतांना आम्ही बोधकथा स्वरूपांमध्ये बोलतो, कारण जरी त्यांना मी जे करतो ते दिसते, तरीही त्याचा अर्थ काय आहे हे त्यांना समजत नाही, आणि मी जे बोलतो ते त्यांना ऐकू येत असले, तरीही त्यात त्याचा अर्थ काय आहे हे ते शिकत नाहीत. 14 बऱ्याच काळापूर्वी देवाने यशया संदेष्याच्याद्वारे जे म्हटले होते ते या लोकांच्याद्वारे अतिशय परिपूर्णरीत्या आज होत आहे,

मी जे बोलत आहे ते तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु ते तुम्हाला समजणार नाही.

मी जे काही करतो ते तुम्ही पाहाल
परंतु त्याचा अर्थ काय होतो
हे तुम्ही शिकणार नाही.

15 देव यशयाला असे देखील म्हणाला,
हे लोक खरोखरच माझे ऐकण्यासाठी असमर्थ झाले आहेत;
मी जे काही बोलत आहे ते खरोखर ऐकत नाहीत.
त्यांनी आपले डोळे बंद करावे असे ते झाले आहेत आणि त्यांना खरोखर पाहण्याची इच्छा नाही
जणुकाय त्यांना काहीही ऐकायचे देखील नाही. ते अशाप्रकारे आहेत त्यामुळे पाप करणे थांबवण्याचा विचारही ते करणार नाहीत.
त्यांच्या अशा कृत्यामुळे मी त्यांना वाचवावे ह्याची त्यांना गरज आहे
याविषयी ते विचार करणार नाहीत.

16 परंतु तुम्हाविषयी म्हणायचे तर देव तुम्हावर प्रसन्न झाला आहे कारण मी जे काही केले ते तुम्ही पाहिले आहे आणि मी जे काही बोलतो ते तुम्ही समजून घेत आहात. 17 तुम्ही याची नोंद घ्या: मी जे काही करत आहे ते पाहण्यासाठी अनेक संदेष्टे आणि नीतिमान लोक फार पूर्वीपासून पाहण्याची अभिलाषा धरत होते, परंतु त्यांना ते पहावयास मिळाले नाही. मी जे काही बोलत आहे ते ऐकावे अशीही त्यांची इच्छा होती, परंतु मी जे बोलत आहे ते त्यांना ऐकता आले नाही.”
पेरणाऱ्याच्या दृष्टान्ताचे स्पष्टीकरण

18 आता मी जी बोधकथा सांगितली त्याचे स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो ते तुम्ही ऐका. 19 देव लोकांच्या जीवनावर कशा पद्धतीने राज्य करण्याची सुरूवात करत आहे याविषयी काही लोक ऐकतात परंतु त्यांना ते कळत नाही. जे बी वाटेवर पडले त्या बियांसारखे ते आहेत. सैतान, जो दुष्ट आहे, तो येतो आणि लोकांनी जे काही ऐकले ते त्यांनी विसरून जावे असे तो करतो.

20 काही लोक देवाचा संदेश ऐकतात आणि लगेचच आनंदाने स्वीकारतात आणि त्याचा ते स्वीकार करतात. ते त्या खडकाळ जागेसारखे आहेत जेथे काही बी पडले होते. 21 परंतु ते त्यांच्या अंतःकरणामध्ये खोलवर न रुजल्यामुळे, ते केवळ थोड्या वेळासाठीच विश्वास धरतात. ज्या रोपट्यांची मुळे खोल नाहीत अशासारखे ते आहेत. म्हणून मी जे काही सांगितले त्यावर विश्वास ठेवल्यामुळे, त्यांच्याशी दूर व्यवहार करतात किंवा त्यांचा छळ करतात, तर माझ्यावर विश्वास ठेवण्याचे नाकारून ते पाप करतात.

22 काही लोक देवाचे वचन ऐकतात, परंतु त्यांना श्रीमंत होण्याची अभिलाषा असते, म्हणून ते पैशाविषयी काळजी करतात आणि त्या पैशांनी ते काय विकत घेऊ शकतात याचा विचार करतात. परिणामी, ते देवाचा संदेश विचारतात आणि त्यांनी काय करावे अशी जी देवाची इच्छा आहे ते त्या गोष्टी करत नाहीत. ज्या जमिनीमध्ये काटेरी झुडपे होती अशा जमिनीसारखे आहेत. 23 परंतु काही लोक माझा संदेश ऐकतात आणि तो संदेश ते समजून घेतात, देवाला आवडतात अशा गोष्टी काही लोक करतात, इतर काही लोक देवाला आवडणांऱ्या अधिक जास्त गोष्टी करतात, आणि काही लोक तर देवाला प्रिय वाटणाऱ्या अशा खूप गोष्टी करतात. ज्या चांगल्या जमिनीमध्ये बी पडले आणि त्यांनी पुष्कळ उत्पन्न दिले अशा जमिनी सारखे हे लोक होत.”
निदणाचा दृष्टान्त

24 येशूने लोक समुदायाला आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “देव स्वतःला राजा म्हणून प्रकट करण्याची सुरूवात होईल, तेव्हा एखाद्या जमिनीचा मालक आपल्या सेवकांना आपल्या शेतामध्ये चांगले गहू पेरण्यासाठी पाठवतो त्याप्रमाणे होईल. 25 त्या शेताचे रक्षण न करता आणि ते सेवक झोपले असतां, त्या जमिनीच्या मालकाचा शत्रू आला आणि त्याने त्या गव्हांमध्ये जंगली बी ही पेरले. मग तो निघून गेला. 26 नंतर त्या बीयांना अंकूर फुटले आणि त्यातून हिरवी रोपटे वाढू लागली, त्यामध्ये कणसे आकार घेऊ लागली, परंतु त्यासोबतच ती काटेरी झुडपे ही वाढली.

27 म्हणून त्या जमिनीच्या मालकाचे सेवक त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “स्वामी, तुम्ही आम्हाला उत्तम प्रतीचे बीं दिले आणि आम्ही तेच शेतामध्ये पेरले होते. तर मग हे काटेरी झुडपे कोठून आली?’ 28 जमिनीचा मालक त्यांना म्हणाला, ‘माझ्या शत्रूने हे केले आहे.’ त्याच्या दासांनी त्याला म्हटले, ‘आम्ही त्या काटेरी झुडपांना उपटून टाकावे अशी तुझी इच्छा आहे काय?’

29 त्यांने त्यांना उत्तर दिले, ‘नाही, तुम्ही असे करू नका, कारण तुम्ही त्या झुडपांना उपटतांना कदाचित काही गहू ही त्याच वेळेस उपटून टाकाल. 30 कापणीची वेळ येईपर्यंत त्या झुडपांना आणि गव्हाला सोबत वाढू द्या. जेव्हा ती वेळ येईल त्यावेळेस कापणी करणाऱ्यांना मी असे म्हणेन, ‘पहिल्याने झुडपे गोळा करा, त्यांना एकत्र मोळीमध्ये बांधा आणि त्यांना जाळण्यासाठी घेऊन जा. त्यानंतर गहू एकत्र करा आणि तो माझ्या कोठारांमध्ये साठवून ठेवा.’”
मोहरीचा दाणा व खमिर ह्यांचे दृष्टान्त

31 येशूने ही बोधकथा देखील त्यांना सांगितली: “देव स्वतःला राजा म्हणून प्रकट करण्यास सुरूवात करेल, तेव्हा एखाद्या मनुष्याने आपल्या शेतामध्ये मोहरीच्या दाण्याला पेरले आणि ते वाढू लागले तसे होईल. 32 लोक जे पेरतात त्या सर्व बियांणामध्ये मोहरीचे दाणे हे अतिशय लहान असे आहेत, परंतु येथे इस्राएलामध्ये ते फार मोठ्या झाडांमध्ये रूपांतरित होतात. त्या झाडांची परिपूर्ण वाढ होते, तेव्हा ते बागेमधील इतर झाडांपेक्षा कितीतरी मोठ्या आकाराचे होतात. त्यांचा आकार मोठ्या झाडासारखा होतो, आणि ते एवढे मोठे असतात की, त्याच्या फांद्यांमध्ये पक्षी देखील आपली घरटी बांधू शकतात.”

33 येशूने ही देखील बोधकथा सांगितली: “देव स्वतःला राजा म्हणून प्रगट करू लागेल, तेव्हा एखादी स्त्री जी भाकर बनवते त्यासारखे ते असेल. तिने जवळपास चाळीस किलो पीठ घेतले आणि त्यामध्ये थोडेसे खमिर मिसळले, आणि त्या पीठाचा गोळा फुगून मोठा झाला.”

34 लोकसमुदायाला ह्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी येशूने या बोधकथांचा उपयोग केला. तो त्याच्या सोबत संभाषण करत असे तेव्हा तो नेहमीच त्यांना अशा प्रकारच्या गोष्टींच्याद्वारे सांगत असे. 35 बऱ्याच काळापूर्वी देवाने आपल्या संदेष्ट्यांपैकी एकाला जे लिहिण्यास सांगितले होते, त्या गोष्टी तो असे करत असल्याने सत्य ठरल्या.

‘मी त्यांच्याशी बोधकथेच्या रूपात बोलणार; सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून ज्या गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत त्या गोष्टी शिकवण्यासाठी मी त्यांना बोधकथांना शिकवेन.’

निदणाच्या दृष्टान्ताचे स्पष्टीकरण

36 येशूने लोकसमुदायाला पाठवून दिल्यानंतर, तो एका घरात गेला. त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, “गव्हाच्या शेतामध्ये जी झुडपे उगवली त्या बोधकथेचा अर्थ तू आम्हाला स्पष्ट करून सांग.” 37 त्याने उत्तर दिले, “जो चांगले बी पेरितो, तो मनुष्याच्या पुत्राचे प्रतिनिधित्त्व करत आहे. 38 हे जग ज्यामध्ये लोक राहतात, त्यांना ते शेत दर्शवते. देव ज्या लोकांवर राज्य करण्यासाठी सहमत होतो त्या लोकांना जे बीज चांगले वाढले ते दाखवते. सैतान दुष्ट, तो जे काही सांगतो, ते करणारे लोक म्हणजे त्या शेतात वाढलेली काटेरी झुडपे होय. 39 ज्या शत्रूने येऊन काटेरी झुडूपाचे बीं पेरले तो व्यक्ती म्हणजे तो सैतान होय. पिकाची कापणी करण्याची वेळ म्हणजे ह्या जगाची शेवटची वेळ होईल. कापणी करणारे देवदूताचे प्रतिनिधित्त्व करतात.

40 त्या काटेरी झुडूपांना गोळा करण्यात आले आणि ते जाळले गेले. देव सर्व लोकांचा न्याय करेल, त्यावेळेस काय घडणार आहे हे त्यावरून दिसून येते त्यावेळेस जगाचा अंत होईल. आणि ते ह्याप्रमाणे असेल: 41 मी, मनुष्याचा पुत्र, माझे देवदूत पाठवेन, आणि या सर्व लोकांवर मी राज्य करणे सुरू केले आहे त्यांच्यामध्ये माझ्यावर विश्वास ठेवल्यापासून आणि माझ्याविरुद्ध इतर गोष्टींच्या द्वारे पाप करण्याचे जे कारण बनलेले लोक आहेत त्यांना एकत्र गोळा करतील. 42 देवदूत अशा प्रकारच्या लोकांना नरकाच्या अग्नीमध्ये फेकून देतील. तिथे त्यांना ज्या मोठ्या वेदना होतील त्यामुळे ते लोक दात खातील आणि विलाप करतील. 43 तथापि, देवाच्या इच्छेप्रमाणे जे लोक जगले आहेत त्यांच्यावर देवाचा प्रकाश प्रकाशेल. सूर्य ज्या तेजाने प्रकाशतो तसे देवाचे तेज त्यांच्यावर प्रकाशेल. हा प्रकाश त्यांच्यावर पडेल कारण देव, जो त्यांचा पिता, त्यांच्यावर राज्य करणार आहे. मी आता जे काही बोललो आहे; त्याविषयी जर तुम्ही लक्षपूर्वक विचार केला, तर तुम्हाला ह्या गोष्टींची समज प्राप्त होईल.”
ठेव, मोती व जाळे ह्यांचे दृष्टान्त

44 “एखाद्या व्यक्तीने एका शेतामध्ये एक मोठा खजाना लपवला होता आणि तो एखाद्या व्यक्तीला सापडला अशा व्यक्तीसारखे ते लोक होते, जे देव त्यांच्यावर राज्य करू इच्छितो ह्याविषयी समजतील. या व्यक्तीने ते शेत खोदले, तेव्हा त्याने ते पुन्हा लपवून ठेवले जेणेकरून इतर कोणालाही ते सापडू नये. आणि मग तो तेथून निघून गेला आणि त्याने आपली सर्व मालमत्ता विकली आणि त्याने ते शेत खरेदी करण्यासाठी पैसा गोळा केला. आणि मग तो पुन्हा गेला आणि त्याने ती शेती विकत घेतली आणि आता त्या शेतातील खजाना तो प्राप्त करण्यास समर्थ झाला.

45 तसेच, देव आपल्या लोकांवर राज्य करण्याची सुरूवात करतो, तेव्हा एक व्यापारी चांगल्या दर्जाचे मोती विकत घेण्यासारखे आहेत. 46 एक अतिशय मौल्यवान मोती विकण्यासाठी उपलब्ध आहे असे त्याला आढळले, तेव्हा त्याने आपली सर्व मालमत्ता विकून तो मोती विकत घेण्यासाठी पुरेसा पैसा गोळा केला. आणि मग तो जाईल आणि त्याला तो विकत घेईल.

47 देव स्वतःला राजा म्हणून प्रगट करेल, तेव्हा एका मोठ्या तळ्यातील माशांना मोठी जाळी टाकून पकडणाऱ्या मासेमाऱ्यांसारखे होईल. त्यांनी त्या जाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या माशांना धरले, त्यामध्ये काही उपयोगी आणि काही निरुपयोगी मासेही आले. 48 त्यांचे जाळे पूर्ण भरले, तेव्हा मासेमारी करणाऱ्या लोकांनी ते वर ओढले आणि त्याला किनार्‍यावर आणले. मग ते तेथे बसले आणि त्यांनी चांगले मासे आपल्या बाधल्यांमध्ये भरले, परंतु ज्या माशांचा त्यांना उपयोग नव्हता त्यांना त्यांनी दूर फेकून दिले.

49 ह्या जगाचा अंत होईल तेव्हा जे निरुपयोगी लोक आहेत यांचेही असेच होईल. जेथे देव लोकांचा न्याय करत आहे तेथे देवदूत येतील आणि दुष्ट लोकांना नीतिमान लोकांपासून वेगळे करतील. 50 ते दुष्ट लोकांना नरकाच्या अग्नीमध्ये फेकून देतील. आणि ते दुष्ट लोक तेथे रडतील आणि आपले दात खातील कारण त्या ठिकाणी त्यांच्या वेदना फार भयंकर असल्याने त्यांना त्रास होईल.”

51 मग येशूने आपल्या शिष्यांना असे विचारले, “मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व बोधकथा ह्या तुम्हाला समजल्या आहेत काय?” ते त्याला म्हणाले, 52 “होय, आम्हाला त्या समजल्या आहेत.” नंतर त्याने म्हटले, “तुम्हाला ह्या सर्व बोधकथा समजल्या आहेत, म्हणून तुम्हाला ही बोधकथा देखील नक्कीच समजेल: देव आपल्या लोकांवर कशा पद्धतीने राज्य करू इच्छितो, हे तुम्ही, इतर लोकांना शिकवावे, कारण मी तुम्हाला जे काही म्हटले आहे ते तुम्ही ऐकले आहे. तुम्ही या आधी जे काही शिकला आहात त्यामध्ये तुम्ही हे ही जोडा. आणि तुम्ही मिळून ह्या गोष्टी इतरांना शिकवा. एखादा घर मालक आपल्या साठवणीच्या खोलीतून जुन्या गोष्टी आणि नव्या गोष्टी बाहेर काढतो अशा घर मालकासारखे तुम्ही व्हाल.”
नासरेथात येशूचा अव्हेर

53 येशूने ह्या सर्व बोधकथांना सांगणे संपवले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना घेतले आणि तो त्या प्रदेशातून निघून गेला.

54 मग ते येशूच्या मूळगावी, म्हणजेच नासरेथास गेले. शब्बाथ दिवशी त्याने लोकांना सभास्थानामध्ये शिकवण देण्यास सुरूवात केली. याचा परिणाम असा झाला की लोक अतिशय आश्चर्यचकित झाले. परंतु त्यांच्यापैकी काही लोक म्हणाले, “हा व्यक्ती तर आमच्या सारखाच सर्वसाधारण व्यक्ती आहे! तर मग याला एवढे कसे ठाऊक आहे आणि तो इतक्या गोष्टी कशा समजू शकतो? आणि तो इतके चमत्कार करण्यास कसा समर्थ झाला? 55 हा तर केवळ एका सुताराचा मुलगा आहे, होय की नाही? त्याच्या आईचे नाव मरीया, आणि त्याचे लहान भाऊ याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदा हेच आहेत! 56 आणि त्याच्या बहिणी देखील आमच्या सोबत याच गावात राहतात. तर मग हे सर्व चमत्कार करणे याला कसे शक्य आहे?”

57 येशू हाच ख्रिस्त आहे असे तेथील लोकांनी स्वीकारण्यास नाकार दिला. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “मी आणि इतर संदेष्टे जेथे कोठे जातो तेथे लोक आमचा सन्मान करतात, परंतु आमच्या स्वतःच्या गावी आमचा सन्मान होत नाही आणि आमचे स्वतःचे कुटूंबीय देखील आमचा सन्मान करत नाहीत!” 58 येशू ख्रिस्त आहे असा तेथील लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही त्यामुळे येशूने तेथे खूप चमत्कार केले नाहीत.