12
शब्बाथाचे पालन

1 त्यावेळेस एका शब्बाथ दिवशी, येशू आणि त्याचे शिष्य ज्या शेतामध्ये काही धान्य होते त्या शेताजवळून जात होते. शिष्यांना भूक लागलेली असल्यामुळे, त्यांनी त्या शेतातील धान्याची काही कणसे तोडली आणि ते ती कणसे खाऊ लागले, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याची परवानगी होती. 2 ते असे करत असतांना काही परूश्यांनी त्यांना पाहिले, म्हणून ते येशूला म्हणाले, “पाहा! तुझे शिष्य विसावा घेण्याच्या दिवशी देखील काम करत आहेत. नियमशास्त्र आम्हाला असे करण्याची परवानगी देत नाही!”

3 परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “आपला पूर्वज आणि राजा दावीद याच्यासोबत असलेले मनुष्य जेव्हा त्यांना भूक लागली त्यावेळेस त्यांनी काय केले हे शास्त्रलेखामध्ये लिहिलेले आहे. तुम्ही ते वाचले आहे, परंतु त्याचा अर्थ काय होतो याविषयी तुम्ही कधी विचार केलेला नाही! 4 देवाची उपासना करतात त्या पवित्र तंबूमध्ये दावीदाने प्रवेश केला आणि त्याने तेथे काही अन्न मागितले. देवासमोर काही भाकरी मांडण्यात आल्या होत्या त्या भाकरी मुख्य याजकाने त्याच्या हातात दिल्या. परंतु मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, ती भाकर केवळ याजकच खाऊ शकत होते, परंतु दावीद आणि त्याच्या मनुष्यांनी त्या भाकरी खाल्ल्या. आणि देवाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काहीच चूक केली नव्हती!

5 तसेच, मोशेने लिहिले आहे ते तुम्ही नक्कीच वाचले असेल, तो म्हणतो जरी याजक आमच्या शब्बाथ दिवशी मंदिरात काम करत असले, तर ते यहूदी कायद्यांचे विश्रांती दिवस पाळत नाहीत, तरी देखील ते दोषी नाहीत. 6 याचा अर्थ काय होतो ते मला तुम्हाला सांगायचा आहे म्हणून मी तुम्हाकडे आलो आहे, आणि मी मंदिरापेक्षाही महत्त्वाचा आहे, म्हणून आपल्या पूर्वजांनी शब्बाथ दिवसाविषयी काय म्हटले यापेक्षा मी तुम्हाला जे काही शिकवत आहे त्याचे तुम्ही पालन करावे हे महत्त्वाचे आहे.

7 शास्त्रलेखामध्ये लिहिलेल्या देवाच्या या वचनाविषयी तुम्ही विचार केला पाहिजे: ‘तुम्ही लोकांसोबत दयेने वागावे ही माझी इच्छा आहे, आणि केवळ बलिदानच करत राहू नये’ ह्या वचनाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला कळाले असते, तर तुम्ही माझ्या शिष्यांना दोष लावला नसता, त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. 8 मी मनुष्याचा पुत्र आहे, आणि शब्बाथ दिवशी लोकांनी काय केले पाहिजे हे सांगण्याचा मला अधिकार आहे.”
वाळलेल्या हाताचा मनुष्य

9 त्यादिवशी येशू तेथून निघाल्यानंतर, तो एका सभास्थानात गेला. 10 तेथे त्याला सुकलेल्या हाताचा एक मनुष्य दृष्टीस पडला. शब्बाथ दिवसाविषयी येशूसोबत वाद-विवाद करावा अशी परूश्यांची इच्छा होती, म्हणून त्यांच्यापैकी एकाने येशूला विचारले, “विसावा घेण्याच्या दिवशी लोकांना बरे करण्याची देव आम्हाला परवानगी देतो का?” येशू काहीतरी चुकीचे बोलून एखादे पाप करेल अशी त्यांची आशा होती.

11 त्याने त्यांना उत्तर दिले, “समजा तुम्हापैकी एकाकडे केवळ एकच मेंढरू आहे, आणि शब्बाथ दिवशी ते एका खोल खड्ड्यामध्ये पडले. तर काय तुम्ही त्याला तेथेच सोडून द्याल काय? नक्कीच नाही! तुम्ही त्याला धराल आणि लगेचच त्याला बाहेर काढाल, आणि आमचे शब्बाथ दिवशी असे करणे चुकीचे ठरणार नाही. 12 परंतु एका मेंढरापेक्षा एखादा व्यक्ती कितीतरी मोलवान आहे. तर एखाद्या मनुष्याला कोणत्याही दिवशी बरे करणे हे आम्हासाठी चांगले आहे, आणि आम्ही त्याला शब्बाथ दिवशी देखील बरे करू शकतो!”

13 त्यानंतर तो त्या मनुष्याला म्हणाला, “तू आपला हात लांब कर! त्या मनुष्याने त्याचा सुकलेला हात लांब केला, आणि तो दुसऱ्या निरोगी हाता सारखाच पूर्णपणे निरोगी झाला!
येशूला ठार मारण्याचा कट

14 मग परूशी त्या सभास्थानातून निघून गेले. येशूला कसे ठार मारावे याची योजना ते आखू लागले. 15 परूशी त्याला ठार करण्याची योजना आखत आहेत हे येशूला ठाऊक असल्यामुळे, त्याने शिष्यांना घेतले आणि तो तेथून निघून गेला. लोकांची खूप गर्दी होती, जेथे असंख्य आजारी लोकही होते, आणि ते त्याच्या मागे गेले, आणि त्याने त्या सर्वांना बरे केले. 16 परंतु त्याने त्यांना निक्षून सांगितले की त्यांनी त्याच्या विषयी इतर लोकांना सांगू नये. 17 यशया संदेष्ट्याने फार पूर्वी जे लिहून ठेवले होते ते त्याने अशाप्रकारे नम्रतेने वागण्याद्वारे परिपूर्ण केले. त्याने असे लिहले होते,
18 “हाच तो माझा सेवक होय ज्याला मी निवडले आहे,
मी ह्याच्यावर प्रीती करतो आणि तो मला संतोष देतो.
मी त्याच्यामध्ये माझा आत्मा ठेवीन,
आणि तो परराष्ट्रीयांना न्याय व तारण देईल.

19 तो लोकांसोबत भांडण करणार नाही, आणि तो आरडा-ओरडाही करणार नाही.
आणि तो रस्त्यांवर मोठ्याने बोलणार नाही.
20 अशक्त लोकांसोबत तो अतिशय सौम्यतेने वागणार;
जर एखादा व्यक्ती अगदी मरावयास टेकला असेल, तर तो त्याला ठार करणार नाही.
आणि तो लोकांचा न्याय अतिशय न्यायीपणाने करेल आणि ते दोषी नाहीत अशी घोषणा करेल.
21 म्हणून परराष्ट्रीय लोक त्याच्यावर अगदी पूर्ण मनाने भरवसा ठेवतील.”
सैतानाचे सहाय्य घेतल्याचा आरोप

22 एके दिवशी काही माणसांनी आंधळा आणि जो बोलू शकत नव्हता अशा एका व्यक्तीला येशूकडे आणले कारण त्याला एक दुरात्मा लागलेला होता. येशूने त्याच्यातील दुरात्मा काढून टाकला आणि त्या व्यक्तीला बरे केले. नंतर तो मनुष्य बोलू लागला आणि त्याला पाहता येऊ लागले.

23 ज्या लोकांनी ते पाहिले ते अतिशय आश्चर्य करू लागले. ते एकमेकांना विचारू लागले की, “हा व्यक्ती ख्रिस्त असू शकतो काय, दावीद राजाचा वंशज ज्याची आम्ही वाट पाहत आहोत तो ख्रिस्त हाच व्यक्ती आहे काय?”

24 परूश्यांनी त्या चमत्काराविषयी ऐकले होते म्हणून, ते म्हणाले, “लोकांमधून दुरात्मे घालवण्याची शक्ती ह्या व्यक्तीला सैतानाचा अधिपती, बालजबूलाकडून प्राप्त होते हा सैतान म्हणजेच दुरात्म्यांचा अधिकारी होय, देवापासून हे नाही.” 25 परंतु परूशी काय विचार करत आहेत हे येशूने ओळखले. म्हणून त्याने त्यांना उत्तर दिले, “एका देशातील दोन गट एकमेकांसोबत भांडू लागले, तर त्या देशांमध्ये फूट पडून त्या देशाचा नाश होईल. एकाच शहरात किंवा एकाच घरात राहणारे लोक एकमेकांसोबत भांडू लागले, तर नक्कीच ते एक कुटूंब किंवा एक शहर मिळून राहू शकत नाहीत.

26 अगदी याच प्रकारे, सैतान त्याच्या स्वतःच्या दुष्ट आत्म्यांना घालवू लागला, तर तो स्वतःच्याच विरुद्ध लढत असेल. आणि अशा रीतीने तो त्याच्या सेवकांवर अधिकार करू शकणार नाही! 27 इतकेच काय तर, सैतान माझ्याद्वारे दुरात्मे घालवत असेल, तर तुमचे शिष्य देखील सैतानाच्या सामर्थ्याने दुरात्मे घालवतात हे सत्य आहे का? नाही! परंतु हे सत्य नाही आणि म्हणून तुम्ही जो विचार करत आहात तो तर्काला धरून नाही.

28 परंतु तो देवाचा आत्मा आहे जो दुरात्मे घालवण्याची शक्ती मला देतो, हे यावरून सिद्ध होते की देवाने तुमच्यावर स्वतःला राजा म्हणून दाखवणे आरंभ केले आहे.

29 मी दुरात्मे घालवण्यास का सक्षम आहे हे मी तुम्हाला दाखवतो. एक व्यक्ती सैतानासारख्या एका बलदंड मनुष्याच्या घरात जाऊन जो पर्यंत त्याला बांधत नाही तो पर्यंत त्याची मालमत्ता कोणालाही लुटता येत नाही. परंतु तेथे जाऊन त्याला बांधले, तर नंतर तो त्याची मालमत्ता घेऊ शकेल.

30 म्हणून कोणीही व्यक्ती तटस्थ राहू शकत नाही. मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दुरात्मे काढतो ह्या गोष्टीला जे स्वीकार करत नाहीत ते माझा विरोध करणारे आहेत, आणि लोकांनी माझे शिष्य व्हावे याकरिता जे लोकांना गोळा करत नाहीत ते लोकांनी माझे शिष्य होऊ नये म्हणून त्यांना माझ्यापासून दूर करतात.

31 मला दुरात्मे काढण्यासाठी सक्षम करणारा पवित्र आत्मा नाही असे तुम्ही म्हणत आहात. म्हणून मी तुम्हाला असे म्हणतो: कोणी एखाद्याला कोणत्याही प्रकारे दुखवले व अपमान केला आणि मग त्याबद्दल त्यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी देवाला त्याची क्षमा मागितली, तर देव त्यांना त्याची क्षमा करणार. परंतु पवित्र आत्म्याने केलेल्या कार्याचा जे कोणी अपमान करतील त्यांना देव क्षमा करणार नाही. 32 माझा, म्हणजेच मनुष्याच्या पुत्राचा जे लोक अपमान करतात त्यांना क्षमा करण्यासाठी देव तयार आहे, परंतु पवित्र आत्मा काय करतो त्याचा जर कोणी अपमान केला तर देव अशा लोकांना क्षमा करणार नाही. देव त्यांना आताही क्षमा करणार नाही, आणि येणाऱ्या राज्यातही क्षमा करणार नाही.”

33 “तुम्ही एखाद्या झाडावरील फळ पाहता तेव्हा तुम्ही निर्णय घेता की ते फळ चांगले आहे किंवा वाईट आहे. ते फळ चांगले असेल, तर तुम्हाला हे कळते की ते झाडही नक्कीच चांगले आहे. मी चांगली कार्ये करत आहे, तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की मी चांगला आहे किंवा नाही. 34 तुम्ही विषारी सापांच्या पिल्लांसारखे आहात! तुम्ही वाईट असल्यामुळे, कोणतीही चांगली गोष्ट बोलू शकत नाही. एखादा व्यक्ती काय बोलतो ह्यावरून त्या व्यक्तीच्या आतमध्ये काय आहे ते दिसते 35 चांगले लोक चांगल्या गोष्टी बोलतात. त्यांनी चांगल्या गोष्टींना सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवले आहे आणि त्यांना हवे तेव्हा ते त्या गोष्टींना बाहेर काढू शकतात म्हणूनच ते अशाप्रकारे वागू शकतात. परंतु वाईट लोक वाईट गोष्टी बोलतात. कारण जणूकाय त्यांनी सर्व वाईट गोष्टींचा साठा करून ठेवला आहे आणि त्यांनी त्या गोष्टी अशा ठिकाणी साठवून ठेवल्या आहेत तेथून त्या कोणत्याही वेळेस ते बाहेर काढू शकतात.

36 देव ज्या दिवशी न्याय करणार त्या दिवसाविषयी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की, लोकांनी इतरांना दुःख होईल अशा बोललेल्या प्रत्येक शब्दाची तो त्यांना आठवण करून देईल, आणि त्यांनी जे काही म्हटले त्या विषयी तो त्यांचा न्याय-निवाडा करील. 37 तुम्ही जे कोणते शब्द बोलले आहात त्या शब्दांवरून देव एक तर तुम्हाला नीतिमान ठरवेल, किंवा तुम्ही जे काही बोलला आहात त्यानूसार तो तुम्हाला दोषी ठरवेल.”
चिन्ह दाखवण्याबाबत येशूला केलेली विनंती

38 तेव्हा यहूदी नियमांचे शिक्षक आणि परूश्यांपैकी काही लोकांनी येशूला प्रतिक्रिया दिली, “गुरूजी, देवाने तुम्हाला पाठवले आहे याबद्दल आमची खात्री पटावी म्हणून तुम्हाला एखादा चमत्कार करताना आम्हाला पाहावयाचे आहे.” 39 मग येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही मला या अगोदरच चमत्कार करताना पाहिलेले आहे, परंतु तुम्ही दुष्ट आहात, आणि तुम्ही देवाची उपासना विश्वास योग्यतेने करत नाहीत!” देवाने मला पाठवले आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवावे अशी तुमची इच्छा आहे, परंतु देव तुम्हाला केवळ एकच चमत्कार दाखवणार आहे. योना संदेष्ट्यासोबत जे घडले त्याप्रमाणे हे आहे. 40 एका मोठ्या माशाच्या पोटामध्ये तीन दिवस व तीन रात्र योना होता आणि त्यानंतर देवाने त्याला त्याच्यातून बाहेर काढले. अशाच प्रकारे, मी, मनुष्याचा पुत्र, देखील पृथ्वीमध्ये खोलवर तीन दिवस आणि तीन रात्र राहणार आहे, आणि त्यानंतर देव मला पुन्हा जिवंत करणार आहे.

41 देव ज्या वेळेस सर्व लोकांचा न्याय करणार, त्यावेळेस निनवे शहरातील लोक त्याच्यासमोर तुम्हा लोकांच्या बाजूला उभे राहतील. परंतु योनाने त्यांना चेतावणी दिली त्यावेळी त्यांनी पाप करणे थांबवले होते. आता मी तुम्हाकडे आलो आहे, आणि योना होता त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचा मी आहे, परंतु तरीही तुम्ही पाप करणे थांबवलेले नाही. म्हणून देव तुमचा न्याय करणार आहे.

42 शलमोन राजा ज्या ज्ञानाच्या गोष्टी शिकवत होता, त्या ऐकण्यासाठी एका दुरवरच्या प्रदेशातून इस्त्राएलाच्या दक्षिणेकडे राहणारी, शिबाची राणी, फार पूर्वीच्या काळी आली होती. शलमोन होता, त्याहीपेक्षा मी कितीतरी महत्त्वाचा आहे, आणि आता मी तुम्हाकडे आलो आहे, परंतु तरीही तुम्ही पाप करणे थांबवलेले नाही. म्हणून देव सर्वांचा न्याय करेल तेव्हा शिबाची राणी त्याच्यासमोर तुम्हा लोकांच्या बाजूला उभा राहील, आणि ती तुम्हाला दोषी ठरवील.”
अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारे धोके

43 “कधीकधी जेव्हा एक दुष्ट आत्मा एका व्यक्तीला सोडतो, त्यावेळेस तो निर्जन स्थळामध्ये भटकत राहतो, एखाद्याच्या आत शिरावे आणि विसावा घ्यावा म्हणून तो शोधत फिरतो. परंतु जर त्याला कोणी आढळले नाही, 44 तर तो स्वतःशीच असे म्हणतो, ‘मी ज्या व्यक्तीमध्ये राहत असे त्या व्यक्तीकडे पुन्हा परत जाईन.’ तर तो पुन्हा परत जातो आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर देवाच्या आत्म्याचे नियंत्रण नाही असे त्याच्या दृष्टीस पडते. एखादे घर स्वच्छ झाडलेले आहे आणि सर्वकाही जेथे हवे तेथे नीट ठेवलेले आहे, परंतु ते रिकामे आहे अशा घरासारखे त्या व्यक्तीचे जीवन आहे. 45 मग हा अशुद्ध आत्मा जातो आणि त्याच्याहून अधिक दुष्ट असे सात अशुद्ध आत्मे मिळवतो, आणि ते सर्व त्या व्यक्तीत प्रवेश करतात आणि त्याच्या सोबत राहण्यास सुरूवात करतात. मग त्या व्यक्तीची स्थिती आधी होती, त्याच्यापेक्षाही त्यानंतरची स्थिती त्याहूनही अधिक वाईट होते. तुम्हापैकी ज्या दुष्ट लोकांनी माझे शिक्षण ऐकले आहे तुम्ही देखील हाच अनुभव घ्याल.”
प्रभू येशूचे नातलग

46 येशू त्या लोक समुदायाशी बोलत असतांना, त्याचे लहान भाऊ आणि त्याची आई त्या ठिकाणी आले. तो ज्या घरात उभा राहून बोलत होता त्या घराच्या बाहेर ते उभे होते आणि त्यांना त्याच्याशी बोलण्याची इच्छा होती. 47 कोणीतरी त्याला म्हणाले, “तुझी आई आणि तुझे लहान भाऊ घराबाहेर उभे आहेत, आणि त्यांना तुझ्या सोबत बोलायचे आहे.”

48 मग ज्या व्यक्तीने येशूला हा निरोप दिला त्याला येशू म्हणाला, “माझी खरी आई आणि माझे खरे भाऊ कोण आहेत हे मी तुला सांगतो.” 49 मग त्याने त्याच्या शिष्यांकडे बोट दाखवले आणि म्हणाला, “मी जेवढी माझ्या आईवर आणि माझ्या भावांवर प्रीती करतो तेवढीच मी ह्यांच्यावरही प्रीती करतो. 50 माझा देव जो पिता स्वर्गात राहतो त्याच्या इच्छेप्रमाणे जे करतात, ते माझ्या भावांइतके, माझ्या बहिणींइतके, आणि माझ्या आई इतके मला प्रिय आहेत.”