26
येशूला ठार मारण्याचा कट
1
या सर्व गोष्टी सांगण्याचे येशूने समाप्त केल्यानंतर, तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
2
“आतापासून दोन दिवसानंतर आपण वल्हांडणाचा सण साजरा करणार आहोत हे तुम्हाला माहीत आहे. त्या वेळेस मला, मनुष्याच्या पुत्राला, जे मला वधस्तंभावर खिळणार आहेत त्यांच्या हातात धरून देतील.”
3
त्याच वेळेस मुख्य याजक आणि यहूदी वडील मंडळ हे महान याजक कयफा ह्याच्या घरी जमले होते.
4
येशूला एखाद्या कोड्यामध्ये अडकवून कशी अटक करावी याची ते योजना करत होते जेणेकरून त्यांना त्याला ठार करता आले असते.
5
परंतु ते म्हणाले, “वल्हांडणाच्या सणाच्या दिवसांमध्ये आपण ते करू नये, जर आपण तसे केले, तर लोक कदाचित दंगल करतील.”
बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभ्यंग
6
येशू आणि त्याचे शिष्य बेथानी नावाच्या एका खेड्यात असता, येशूने ज्याला कुष्ठरोगातून बरे केले होते, त्या शिमोनाच्या घरी जेवत होते.
7
ते जेवण करत असता, तेथे घरात एक स्त्री आली. दगडांनी बनवलेल्या एका बाटलीमध्ये अतिशय मोलवान अत्तर घेऊन ती तेथे आली होती. येशू जेवण करत असतांना ती त्याच्याकडे गेली आणि त्याच्या डोक्यावर तिने ते पूर्ण अत्तर ओतून टाकले.
8
जेव्हा शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना खूप राग आला. त्यापैकी एक जण म्हणाला, “हे अत्तर असे वाया घालवणे अतिशय वाईट आहे!
9
आम्ही ते विकले असते आणि त्यामुळे भरपूर पैसे मिळवले असते! मग आम्ही तो पैसा गरीब लोकांना दिला असता.”
10
ते काय बोलत आहेत हे येशूला माहीती होते, म्हणून तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या स्त्रीला अजिबात त्रास देऊ नये! तिने माझ्यासाठी एक अतिशय सुंदर कार्य केले आहे.
11
गरीब लोक तुम्हामध्ये तर नेहमीच असणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला त्यांना मदत करावीशी वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता. परंतु मी नेहमीकरीता तुम्हासोबत राहणार नाही!
12
तिने हे अत्तर माझ्या शरीरावर ओतले, तेव्हा मी लवकरच मरणार आहे हे तिला माहिती झाल्यासारखे वाटले. आणि मला पुरले जाण्याच्या आधी तिने माझ्या शरीराला अभिषेक केल्याप्रमाणे ते झाले.
13
मी तुम्हाला हे सांगतो: माझ्याविषयी संपूर्ण जगामध्ये लोक जेथे कोठे सुवार्ता सांगतील, तेथे ह्या स्त्रीने माझ्यासाठी जे काही केले त्याविषयी ही ते सांगतील, आणि अशा रीतीने लोक नेहमी तिची आठवण करतील.”
यहूदाची फितुरी
14
त्या बारा शिष्यांपैकी एक असून देखील, यहूदा इस्कर्योत, त्या मुख्य याजकांकडे गेला.
15
त्याने त्यांना विचारले, “मी येशूला अटक करण्यास मदत केली. तर त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला किती पैसे देण्यास तयार व्हाल?” त्याला चांदीच्या तीस मोहरा देण्याचे त्यांनी कबूल केले. मग त्यांनी त्या मोहरांना मोजले आणि त्याला त्या देऊन टाकल्या.
16
त्यावेळेपासून येशूला अटक करण्याची संधी यहूदा शोधू लागला.
शेवटले भोजन
17
एक आठवडाभर चालणाऱ्या खमिर न टाकता तयार केलेल्या भाकरीच्या सणाच्या पहिल्याच दिवशी, शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “आम्ही तुझ्यासोबत भोजन करावे म्हणून वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी त्याचे जेवण कुठे करावे अशी तुझी इच्छा आहे?”
18
येशूने त्याच्या दोन शिष्यांना काय करावे याविषयीच्या सूचना त्यांना दिल्या. तो त्यांना म्हणाला, “शहरामधील मी एका मनुष्यासोबत या अगोदरच योजना आखली आहे. तुम्ही त्याच्याकडे जा. त्याला जाऊन असे सांगा: गुरुजी असे म्हणतात, ‘मी तुला ज्या वेळेविषयी सांगितले होते ती वेळ आता जवळ आली आहे. मी तुझ्या घरी माझ्या शिष्यांसोबत वल्हांडणाचे जेवण करून तो सण साजरा करणार आहे, आणि ते भोजन तयार करण्यासाठी मी ह्या दोघांना तुझ्याकडे पाठवले आहे.’”
19
म्हणून येशूने सांगितल्याप्रमाणे त्या दोन शिष्यांनी तसेच केले. त्या मनुष्याच्या घरी जाऊन त्या दोघांनी वल्हांडणाचे भोजन तयार केले.
20
मग ती संध्याकाळ आल्यानंतर, येशू त्याच्या बारा शिष्यांसोबत जेवण करत होता.
21
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका: माझ्या शत्रूंनी मला धरावे यासाठी तुमच्या पैकी एक जण त्यांना मदत करणार आहे.”
22
शिष्य अतिशय उदास झाले. ते त्याला म्हणू लागले, ते एकानंतर एक त्याच्याशी बोलले, “प्रभू, मी तो नक्कीच नाही!”
23
त्याने त्याला उत्तर दिले, “माझ्यासोबत जो भाजीच्या ताटामध्ये जो भाकर बुचकळत आहे. तोच मला माझ्या शत्रूंनी अटक करावी म्हणून मदत करावी आणि तो तुम्हापैकीच एक आहे.
24
माझ्याविषयी शास्त्रलेख जे सांगतात तसे घडावे म्हणून, मनुष्याचा पुत्र, म्हणजे मी नक्कीच ठार केला जाईन. परंतु जो पुरुष माझ्या शत्रूंना मला अटक करण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यासाठी भयंकर शिक्षा वाट पाहात आहे! त्या पुरुषाने कधी जन्म घेतला नसता तर ते त्याच्यासाठी कितीतरी बरे झाले असते!”
25
त्याला जो धोका देणार होता, तो यहूदा त्याला म्हणाला, “प्रभूजी, मी तर तो नक्कीच नाही!” येशूने त्याला उत्तर दिले, “होय, तूच तो आहेस.”
26
ते जेवण करत असतांना, येशूने भाकरीचा एक लहान तुकडा घेतला आणि त्याच्याबद्दल देवाचे आभार मानले. त्याने ती भाकर मोडली, आणि ते तुकडे शिष्यांना दिले, आणि तो म्हणाला, “ही भाकर घ्या आणि ती खा. हे माझे शरीर आहे.”
27
त्यानंतर त्याने द्राक्षरसाचा एक प्याला घेतला आणि त्याच्यासाठी देवाचे आभार मानले. मग त्याने तो त्यांना दिला आणि तो म्हणाला, “तुम्ही सर्व या प्यालातून प्या.
28
ह्या प्याल्यातील द्राक्षरस माझे रक्त आहे ते माझ्या शरीरातून लवकरच वाहीले जाईल. अनेक लोकांच्या पापांची क्षमा करण्यासाठी देव जो नवा करार करणार आहे त्याचे चिन्ह म्हणजे हे रक्त आहे.
29
तुम्ही ह्याची काळजीपूर्वक नोंद घ्या: हा द्राक्षरस एका नव्या अर्थाने पिण्याची वेळ येईपर्यंत मी यानंतर कधीही अशाप्रकारे द्राक्षरस पिणार नाही. माझा पिता सर्वांवर राज्य करत आहे हे प्रगट करेल त्याच वेळेस हे घडेल.”
शिष्य आपल्याला सोडून जातील ह्याबाबत येशूचे भविष्य
30
त्यानंतर त्यांनी एक गीत गायले, आणि मग ते जैतूनाच्या डोंगराकडे चालत गेले.
31
तेथे जात असतांना, येशूने त्यांना सांगितले, “माझ्यासोबत जे घडणार आहे त्यामुळे तुम्हापैकी प्रत्येक जण आज रात्री मला सोडून देईल! हे नक्कीच घडणार आहे कारण देवाने बोललेले हे शब्द शास्त्र लेखामध्ये लिहिलेले आहेत:
‘मनुष्याने मेंढपाळाला ठार करावे असे मी होऊ देईन,
आणि ते सर्व मेंढरांची दाणादाण करतील.’
32
परंतु मी मरण पावल्यावर आणि पुन्हा जिवंत झाल्यानंतर, मी तुमच्या अगोदर गालीलात जाईन आणि तेथे तुम्हाला भेटणार.”
33
पेत्राने उत्तर दिले, “तुझ्यासोबत जे काही घडणार आहे ते पाहून कदाचित सर्व शिष्य तुला सोडून देतील, परंतु मी तुला नक्कीच कधीही सोडणार नाही!”
34
येशूने त्याला उत्तर दिले आणि म्हटले, “आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला ओळखत नाहीस, असे तीन वेळेस तू म्हणशील हे सत्य आहे!”
35
पेत्र त्याला म्हणाला, “मी तुझा बचाव करत असतांना त्यांनी मला ठार जरी केले, तरी मी तुला ओळखत नाही असे कधीही म्हणणार नाही!” इतर सर्व शिष्यांनीही असेच म्हटले.
गेथशेमाने बागेत येशू
36
त्यानंतर गेथशेमाने नावाच्या एका ठिकाणावर येशू आपल्या शिष्यांसोबत पोहोंचला. तेथे तो म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करतो तोपर्यंत तुम्ही येथेच थांबा.”
37
त्याने आपल्या सोबत, पेत्र, याकोब, आणि योहानाला घेतले आणि तो अतिशय चिंताक्रात झाला व कळवळला.
38
त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “मी अतिशय दुःखी आहे, इतका की मी जणुकाय मरावयास टेकलो आहे असे मला वाटते! तुम्ही येथे थांबा आणि माझ्यासोबत जागे राहा.”
39
मग आणखी थोडे पुढे जाऊन, तो जमिनीवर उपडा पडला. त्याने प्रार्थना केली, “हे पित्या, ज्याप्रकारे मला दुःख सहन करावे लागणार आहे, तुला शक्य असल्यास मला ते दुःख सहन करावे लागू देऊ नकोस. परंतु माझ्या इच्छेप्रमाणे करू नकोस. त्याऐवजी, जशी तुझी इच्छा आहे तसे कर!”
40
मग तो त्या तीन शिष्यांकडे परत आला आणि ते त्याला झोपलेले आहेत असे दिसले. त्याने पेत्राला जागे केले आणि त्याला तो म्हणाला, “तुम्ही पुरूष झोपी गेलात हे पाहून मी निराश झालो आहे, तुम्हाला माझ्यासोबत थोडावेळ देखील जागे राहता आले नाही!
41
कोणी तुम्हाला पापात पाडण्यासाठी तुम्हाला मोहात पाडावे अशा वेळेस तुम्ही त्याचा विरोध करावा म्हणून तुम्ही जागे राहून प्रार्थना करणे आवश्यक आहे.”
42
मग तो दुसऱ्यांदा तेथे गेला. त्याने प्रार्थना केली, “माझ्या पित्या, जर मी दुःख सहन करणे अवश्य आहे, तर जे काही घडावे अशी तुझी इच्छा आहे ते घडू दे!”
43
जेव्हा तो त्या तीन शिष्यांकडे परत आला, त्याने पाहिले की ते पुन्हा झोपलेले होते. त्यांच्याने झोप आवरणे अशक्य झाले होते.
44
म्हणून त्यांने त्यांना सोडून दिले आणि तो पुन्हा परत गेला. त्याने तिसऱ्यांदा प्रार्थना केली, त्याने आधी म्हटले तशाच प्रकारे पुन्हा प्रार्थनेमध्ये म्हटले.
45
मग तो इतर सर्व शिष्यांकडे परत आला. त्याने त्यांना जागे केले आणि तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आता ही झोपलेले आहात आणि आराम करत आहा हे पाहून मी निराश होत आहे! पाहा! पापी लोकांनी मनुष्याच्या पुत्राला अटक करावी यासाठी कोणीतरी त्यांना मदत करत आहे!
46
तर उठा! आपण जाऊन त्यांना भेटूया! मला अटक करण्यासाठी त्यांना मदत करणारा जवळ येऊन पोहचला आहे!”
येशूला अटक
47
येशू हे बोलत असतांना, यहूदा तेथे येऊन पोहचला. तो त्याच्या बारा शिष्यांपैकी एक असूनही, येशूच्या शत्रूंना येशूला अटक करावी यासाठी त्याने त्यांना मदत केली. तलवारी आणि भाले घेऊन एक मोठा समुदाय त्याच्यासोबत होता. वडिलांनी आणि मुख्ययाजकांनी त्यांना तेथे पाठवले होते.
48
यहूदाने अगोदरच त्यांना एक इशारा निश्चित करून ठेवला होता. त्याने त्यांना असे सांगितले होते की, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच मनुष्य तुम्हास हवा आहे. त्याला अटक करा!”
49
तो लगेचच येशूकडे गेला आणि त्याला म्हणाला, “गुरूजी, अभिवादन!” आणि मग त्याने येशूचे चुंबन घेतले.
50
येशूने उत्तर दिले, “मित्रा, तू जे काही करण्याचे ठरवले आहे, ते लवकर कर.” मग यहूदासोबत जे लोक आले होते ते पुढे आले आणि त्यांनी येशूला पकडले.
51
तेव्हा अचानक, येशूसोबत असलेल्या पुरूष्यांपैकी एकाने आपल्या म्यानातून तलवार काढली आणि मुख्य याजकाच्या एका सेवकावर त्याला ठार करण्यासाठी त्याने वार केला, परंतु त्या सेवकाचा केवळ कानच कापला गेला.
52
येशू त्याला म्हणाला, “तू आपली तलवार तिच्या म्यानात परत घाल! जे इतरांना तलवारीने ठार करू इच्छितात, इतर कोणीतरी त्या व्यक्तीला देखील तलवारीने ठार करेल!
53
तुम्हाला काय वाटते मी जर माझ्या पित्याला विनंती केली तर तो माझ्यासाठी देवदूतांच्या सैन्याच्या बारा तुकड्यांना लगेचच पाठवून देणार नाही काय?
54
परंतु जर मी तसे केले, तर संदेष्ट्यांनी शास्त्र लेखांमध्ये लिहिल्याप्रमाणे मसीहा सोबत जे काही घडणार आहे ते परिपूर्ण होणार नाही.”
55
जे लोक येशूला धरण्यासाठी आले होते, त्यांना येशू त्यावेळेस म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि भाले घेऊन मला धरण्यासाठी आला आहात हे किती आश्चर्यकारक आहे, एखाद्या दरोडेखोराला धरायला यावेत तसे तुम्ही आला आहात! तुमच्या मंदिराच्या अंगणामध्ये दररोज मी बसलेलो असायचो आणि लोकांना शिकवत असे. तुम्ही मला तेव्हा का अटक केली नाही?
56
परंतु माझ्याविषयी शास्त्र लेखामध्ये संदेष्ट्यांनी लिहिलेल्या सर्व गोष्टी परिपूर्ण होण्यासाठी हे केवळ घडत आहे.” मग येशूच्या सर्व शिष्यांनी येशूला सोडून दिले आणि ते तेथून पळून गेले.
प्रमुख याजकापुढे येशूची चौकशी
57
मुख्य याजक कयफा ज्या ठिकाणी राहत होता त्या घरात ज्यांनी येशूला अटक केली होती ते त्याला घेऊन गेले. यहूदी नियम शिकवणारे पुरूष आणि यहूद्यांमधील वडील अगोदर पासूनच तेथे एकत्रित झालेले होते.
58
पेत्र दुरवरून येशूच्या मागे मागे चालत होता. मुख्य याजकाच्या घराच्या अंगणामध्ये पेत्र आला. त्याने अंगणामध्ये प्रवेश केला आणि रक्षकांच्या सोबत तो बसला आणि काय घडत आहे ते पाहू लागला.
59
येशूला मृत्युदंड देता यावा म्हणून मुख्य याजक आणि यहूद्यांच्या धर्म सभेतील इतर लोक अशा लोकांचा शोध घेत होते जे त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देतील.
60
परंतु अनेक लोकांनी त्याची खोटी साक्ष देऊन देखील त्यांना असा कोणी सापडला नाही जो उपयोगी साक्ष देऊ शकेल. शेवटी दोन पुरूष समोर आले आणि म्हणाले,
61
“ह्या मनुष्याने म्हटले आहे की, ‘मी देवाच्या मंदिराचा नाश करण्यास आणि तीन दिवसात ते पुन्हा उभारण्यास समर्थ आहे.’”
62
मग मुख्य याजक उभा राहिला आणि येशूला म्हणाला, “तू ह्यांना प्रत्युत्तर देणार नाहीस काय? ते तुझ्यावर ज्या गोष्टींचा आरोप लावत आहेत त्याविषयी तुला काय म्हणायचे आहे?”
63
परंतु येशू शांत राहिला. मग मुख्य याजक त्याला म्हणाला, “मी तुला आज्ञा करतो की तू मला सत्य सांगावे; सर्वसमर्थ देव तुझे ऐकत आहे हे तुला ठाऊक आहे: तू देवाचा पुत्र, ख्रिस्त आहेस काय?”
64
येशूने उत्तर दिले, “होय, तू म्हणतो ते तसेच आहे. परंतु मी तुम्हा सर्वांना हे देखील सांगतो: तुम्ही मला, मनुष्याच्या पुत्राला, एके दिवशी सर्वसमर्थ देवाच्या बाजूला बसून अधिकार करत असतांना पाहणार आहात. तसेच स्वर्गातून ढगांवर बसून येत असतांना मी तुम्हाला दिसणार आहे!”
65
ह्यामुळे मुख्य याजक एवढा व्यथीत झाला की त्याने आपला अंगरखा फाडला. मग तो म्हणाला, “ह्या मनुष्याने देवाचा अपमान केला आहे! तो देवाच्या समान आहे असा स्वतःविषयी दावा करतो! आता ह्या मनुष्याच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी आम्हाला आणखी कोणाची गरज नाही! त्याने काय म्हटले ते तुम्ही ऐकले आहे!
66
तुम्हाला ह्याविषयी काय वाटते?” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आमच्या नियमांप्रमाणे, हा दोषी ठरला आहे आणि ह्याला मृत्युदंड देण्यात यावा!”
67
मग त्यांच्यापैकी काही लोक त्याच्या तोंडावर थुंकले. आणि इतर लोकांनी त्याला बुक्कयांनी मारहाण केली. इतर अनेकांनी त्याला चापटा मारल्या;
68
आणि ते म्हणाले, “तू ख्रिस्त असल्याचा दावा करतोस, म्हणून तुला कोणी मारले ते आम्हास सांग!”
पेत्र येशूला नाकारतो
69
पेत्र बाहेर अंगणामध्ये बसला होता. तेथील एक दासी त्याच्या जवळ आली आणि तिने त्याला पाहिले. ती म्हणाली, “गालील जिल्ह्यातील तो मनुष्य येशू, त्याच्यासोबत तू देखील होतास !”
70
परंतु सगळेजण हे संभाषण ऐकत असतांना, त्याने तिचे म्हणणे नाकारले. तो म्हणाला, “तू कशाविषयी बोलत आहेस हे मला ठाऊक नाही!”
71
मग तो घराच्या अंगणातून निघून बाहेरील दाराजवळ गेला. दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले आणि तिथे उभ्या असलेल्या लोकांना ती म्हणाली, “नासरेथाहून आलेला तो मनुष्य येशू याच्यासोबत हाही मनुष्य होता.”
72
परंतु पेत्राने पुन्हा एकदा नकार दिला. तो म्हणाला, “मी जर खोटा बोलत असेल तर परमेश्वर मला शिक्षा देवो! मी तर तुम्हाला सांगतो, मी तर त्या मनुष्याला ओळखत देखील नाही!” मग पेत्र अंगणात बाहेर आला त्याने जे केले त्याबद्दल दुःख झाले आणि तो रडला.
73
आणखी थोड्या वेळानंतर, जे लोक तेथे उभे होते ते पेत्राच्या जवळ आले, आणि ते त्याला म्हणाले, “आम्हाला नक्कीच खात्री आहे की तू देखील त्या मनुष्यासोबत होतास . तुझ्या बोलण्याच्या शैलीवरून आम्ही ओळखू शकतो की तू देखील गालीलाचा आहेस.”
74
मग पेत्र मोठमोठ्याने असे बोलू लागला की जर तो खोटा बोलत असेल तर देव त्याला शाप देईल. तो खरे सांगत आहे ह्याचा साक्षीदार म्हणून त्याने देवाला स्वर्गातून साक्ष देण्याची विनंती केली आणि तो म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!” आणि लगेचच कोंबडा आरवला.
75
मग येशूने त्याच्याशी बोललेले होते ते पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला ओळखत नाहीस असे तू म्हणशील.” मग पेत्र अंगणातून बाहेर आला, आणि त्याने जे केले त्याबद्दल त्याला दुःख झाले म्हणून तो फार रडला.