10
1
येशूने त्याच्या बारा शिष्यांना स्वतःकडे येण्यास सांगितले. लोकांना नियंत्रित करणाऱ्या अशुद्ध आत्म्यांना काढून टाकण्याची शक्ती त्याने त्यांना दिली. वेगवेगळ्या प्रकारे आजारी असणाऱ्यांना आणि निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी जडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी त्याने त्यांना सक्षम केले.
2
त्याने त्यांना प्रेषित हे नाव दिले, त्या बारा शिष्यांची ही यादी आहे. शिमोन ज्याला त्याने पेत्र असे नाव दिले; पेत्राचा लहान भाऊ अंद्रिया; जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबाचा लहान भाऊ योहान,
3
फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय,
4
शिमोन कनानी व त्याला (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत.
5
वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी या बारा शिष्यांना येशू पाठवत असतांना त्याने त्यांना या प्रकारे सुचना केल्या: “परराष्ट्रीय लोक राहतात त्या ठिकाणांमध्ये जाऊ नका किंवा शोमरोनी लोक राहतात त्यांच्या गावातही जाऊ नका.
6
त्याऐवजी इस्राएलातील लोकांकडे जा; ज्या मेंढपाळापासून मेंढरे जशी भटकून जातात त्याप्रमाणे ते लोक आहेत.
7
जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाल तेव्हा त्यांना अशी घोषणा करून सांगा की देव लवकरच स्वतःला त्यांचा राजा म्हणून प्रकट करणार आहे.
8
आजारी लोकांना बरे करा, मेलेल्या लोकांना तुम्ही पुन्हा जिवंत करा, कुष्ठरोग झालेल्यांना बरे करा, आणि त्यांना समाजाचा भाग बनण्यासाठी परत आणा ज्या लोकांना भूतांनी नियंत्रित केलेले आहे अशांमधून त्यांना काढून टाका. लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारे पैसा घेऊ नका कारण देवानेही तुमची मदत करावी म्हणून तुमच्याकडून कसल्याही प्रकारचा पैसा घेतलेला नाही.
9-10
तुम्ही आपल्या सोबत काहीच पैसा घेऊ नका, किंवा काय कपडे घालावे त्यासाठी एखादी थैलीही घेऊ नका, तसेच चालण्यासाठी काठी देखील ठेवू नका. स्वतःसोबत तुम्ही एखादा जास्तीचा अंगरखा किंवा जास्तीचे चपलांचे जोड घेऊ नका, तुम्ही जे काही घातले आहे तेवढेच तुम्हासाठी पुरे आहे. ज्या लोकांसाठी एखादा कामकरी काम करतो, त्या लोकांपासून काम करणाऱ्याला वेतन मिळावे हे योग्य आहे; म्हनून तुम्ही ज्या लोकांकडे राहाल त्यांच्याकडून तुम्ही भोजन आणि राहण्यासाठी जागा स्वीकारावी.
11-12
तुम्ही एखाद्या गावात किंवा एखाद्या खेड्यात प्रवेश केला असता ज्या मनुष्याची तुम्ही त्याच्या घरी राहावे अशी इच्छा आहे असा मनुष्य शोधा. तुम्ही जेव्हा त्याच्या घरात प्रवेश कराल तेव्हा देवाने त्या घरात राहणाऱ्या लोकांचे भले करावे अशी त्याच्याकडे प्रार्थना करा. तुम्ही ते गाव किंवा ते शहर सोडेपर्यंत त्याच व्यक्तीच्या घरात राहावे.
13
त्या घरात राहणाऱ्या लोकांनी जर तुमचा खरोखर चांगला स्वीकार केला तर देव नक्कीच त्यांचे भले करणार. परंतु जर त्यांनी तुमचा स्वीकार पूर्ण मनाने केला नाही तर तुमची प्रार्थना त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही आणि देवही त्यांचे भले करू शकणार नाही.
14
त्या घरात राहणाऱ्या किंवा त्या गावातील लोकांनी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमच्या संदेशाला ऐकले नाही तर तुम्ही ते ठिकाण सोडून द्या. तुम्ही तिथून निघत असतांना तुमच्या पायाची धूळ झटकून टाका. तुम्ही जे काही बोलाल त्याचा त्यांनी जसा नाकार केला तसाच देवही त्यांचा नाकार करणार आहे. असा इशारा तुम्ही त्याद्वारे त्यांना द्याल.
15
तुम्ही हे लक्षपूर्वक नोंद करा: देव सर्व लोकांचा न्याय करणार आहे तेव्हा तो सदोम गमोरा येथील दुष्ट लोकांना शासन करेल. परंतु तुम्ही ज्या कोणत्याही शहरात जाता तेथील लोकांनी जर तुमचा नकार केला तर देव त्यांना त्यांच्यापेक्षाही जास्त कठोरपणे शासन करणार आहे.
16
“हे लक्षात घ्या: जेव्हा मी तुम्हांला पाठवत आहे तेव्हा तुम्ही धोकादायक कोल्ह्यांच्या समोर स्वतःचा बचाव न करू शकणाऱ्या मेंढरांप्रमाणे त्या लोकांमध्ये पाठवले जात आहात. आणि जसे कबूतर कोणाला त्रास देत नाही तसे तुम्ही देखील कबूतराप्रमाणे कोणालाही उपद्रव करू नये. अशा लोकांपासून तुम्ही निरंतर स्वतःचा बचाव करण्याच्या स्थितीत असावे जसा साप लोकांविरुद्ध स्वतःचा बचाव करण्यासाठी सावध असतो तसे तुम्हीही असावे.
17
तुम्ही लोकांविषयी सावध असा कारण ते तुम्हांला अटक करतील आणि धर्मसभेच्या सदस्यांच्या समोर तुमची कसोटी व्हावी म्हणून ते त्यांच्यासमोर तुम्हांला उभे करतील; तुम्ही माझे शिष्य आहात म्हणून ते तुम्हांला शिक्षा करतील. ते त्यांच्या सभास्थानांमध्ये तुम्हांला नेतील आणि तुम्हाला चाबकांनी फटके मारतील.
18
तुम्ही माझे आहात म्हणून ते तुम्हांला राज्यपालांपुढे आणि राजां पुढे नेतील जेणेकरून तुमचा न्याय व्हावा आणि तुम्हांला दंड देण्यात यावा. परंतु तुम्ही त्या अधिकार्यांना आणि इतर परराष्ट्रीय लोकांना माझ्याविषयी साक्ष द्याल.
19
जेव्हा ते लोक तुम्हांला अटक करतील तेव्हा तुम्ही त्यांना काय बोलणार आहात या विषयी काळजी करू नका कारण त्या क्षणी पवित्र आत्मा तुम्ही कोणते शब्द बोलावे ते तुम्हांला सुचवणार आहे.
20
तुम्ही काय बोलणार आहात ह्याचा निर्णय तुम्ही करू नका, त्याऐवजी स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा तुम्हांला सुचवणार आहे.
21
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून ते तुम्हांला ठार करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हातात सोपवतील. उदाहरणार्थ, लोक त्यांच्या भावांसोबत तसे करतील आणि वडील त्यांच्या मुलांना धरून देतील. मुले देखील आपल्या आई-वडिलांच्या विरुद्ध बंडाळी करतील आणि त्यांना ठार मारावे म्हणून त्यांना धरून देतील.
22
तुम्ही माझ्यावर भरंवसा ठेवता म्हणून लोक तुमचा तिरस्कार करतील. परंतु जे कोणी मरेपर्यंत माझ्यावर विश्वासूपणे भरंवसा ठेवतील त्या लोकांचा देव बचाव करेल.
23
जेव्हा एखाद्या शहरातील लोक तुम्हांला छळतील तेव्हा तुम्ही ते शहर सोडून दुसऱ्या शहराकडे पळून जा. हे लक्षात ठेवा: जेव्हा मी मनुष्याचा पुत्र निश्चितच या पृथ्वीवर परत येण्या आधी, तुम्ही इस्त्राएलामधिल एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये लोकांना माझ्याविषयी सांगणे संपविणे होणार नाही.
24
एखाद्या शिष्याने आपल्या गुरूपेक्षा महान व्हावे अशी अपेक्षा करू नये आणि दासाने देखील आपल्या स्वामी पेक्षा मोठे होण्याची अपेक्षा करू नये.
25
लोकांनी एखाद्या शिक्षकापेक्षा अधिक सन्मान त्याच्या विद्यार्थ्यांना द्यावा अशी अपेक्षा आपण करू शकत नाही किंवा एखाद्या दासाच्या मालकाला लोक जेव्हा सन्मान देतात त्यापेक्षा जास्त सन्मान ते त्याच्या दासाला देऊ शकत नाहीत. त्याच प्रकारे मी तुमचा शिक्षक व तुमचा स्वामी आहे म्हणून लोक तुमच्या सोबत दूरव्यवहार करतील अशी अपेक्षा बाळगा कारण त्यांनी माझ्या सोबत देखील वाईट वर्तन केले आहे. तुम्ही जास्तीत जास्त अशी अपेक्षा करू शकता की त्यांनी माझ्या सोबत जसे वर्तन केले, तसे ते तुम्हा सोबतही करतील. ज्याला ते सैतान म्हणतात, त्याच्या घराण्यावर राज्य करणाऱ्यासारखे ते मला समजतात. जर त्यांनी माझ्यासोबत वाईट वर्तन केले आहे तर ते तुम्हा सोबत कसे वागतील असे तुम्हांला वाटते?”
26
“तुम्ही अशा प्रकारच्या लोकांना घाबरू नका. लोकांना आतापर्यंत जे सर्वकाही गुप्त आहे, ते आता त्यांना तुम्ही प्रगट करावे ही देवाची इच्छा आहे. त्याच्याविषयीचे जे काही सत्य आहे, ते तुम्ही लपून ठेवावे अशी त्याची इच्छा नाही किंवा ते गुप्त ठेवावे असेही त्याला वाटत नाही.
27
म्हणून त्यांना घाबरण्याच्या ऐवजी, मी तुम्हांला जे काही गुप्तपणे सांगतो जणू काय ते रात्री सांगत असल्यासारखे, तुम्ही लोकांकडे जाऊन ते भर दिवसा उजेडात मोठ्याने सांगावे. ज्या गोष्टी मी तुम्हांला गुप्तपणे एकांतात सांगितल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही लोकांना उघडपणे सार्वजनिकरित्या सांगाव्यात.
28
जे केवळ तुमच्या शरीराला ठार करू शकतात परंतु तुमच्या आत्म्याचा नाश करू शकत नाहीत अशा लोकांना घाबरू नका. परंतु त्याऐवजी जो तुमच्या शरीराला आणि तुमच्या आत्म्याला नरकामध्ये नाश करू शकतो त्या देवाला भ्या.
29
चिमण्यांविषयी विचार करा, त्यांची किंमत ऐवढी कमी असते की तुम्ही एका नाण्यामध्ये त्या दोन खरेदी करू शकता. परंतु जेव्हा त्यातली एक चिमणी जमिनीवर पडते आणि मरण पावते तेव्हा तुमच्या स्वर्गातील बापाला ते ठाऊक आहे कारण त्याला सर्वकाही माहीत आहे.
30
तसेच त्याला तुम्हाविषयी ही सर्व काही ठाऊक आहे, तुमच्या डोक्यावर किती केस आहेत हे देखील त्याला माहित आहेत!
31
देव चिमण्यांची जेवढी किंमत करतो त्यापेक्षाही कितीतरी अधिक तुम्ही त्याच्यासाठी मोलवान आहात, म्हणून जेव्हा लोक तुम्हाला ठार मारण्याची धमकी देतात तेव्हा तुम्ही त्यांना घाबरू नका.
32
जेव्हा लोक इतरांना हे सांगतील की ते माझे आहेत तेव्हा मी देखील माझा पिता जो स्वर्गात आहे त्याच्या समोर ते लोक माझे आहेत ह्याचा स्वीकार करेन.
33
परंतु जर ते लोकांसमोर ते माझे आहेत आणि याचा स्वीकार करण्यास घाबरतील तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्यालाही मी सांगणार की ते लोक माझे नाहीत.
34
“या पृथ्वीवरील लोकांनी एकमेकांसोबत शांतीत जगावे असे सांगण्यासाठी मी आलो आहे असा विचार करू नका. मी आलो आहे म्हणून मला अनुसरण करणाऱ्यांपैकी काही लोक ठार केले गेले.
35
मी या पृथ्वीवर आलो आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्याविरुद्ध जे माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत असे लोक उठतील. उदाहरणार्थ, काही पित्यांची मुले आपल्या वडिलांचा विरोध करतील काही मुले आपापल्या आईंचा विरोध करतील आणि काही सुना आपल्या सासूंच्या विरोधात उभ्या राहतील.
36
कधी कधी एखाद्या व्यक्तीचे शत्रू हे त्याच्या घरातील आपले स्वतःचे लोक असतात हे यावरुन तुम्हांला दिसून येईल.
37
जे लोक स्वतःच्या आईवर किंवा स्वतःच्या वडिलांवर माझ्याही पेक्षा अधिक प्रीती करतात असे लोक माझे होण्याच्या योग्यतेचे नाहीत. आणि जे लोक माझ्या पेक्षाही अधिक स्वतःच्या मुलांवर किंवा स्वतःच्या मुलींवर प्रीती करतात ते देखील माझे लोक होण्याच्या योग्यतेचे नाहीत.
38
तुम्ही माझे आहात म्हणून जर तुम्ही मरण्यासाठी देखील तयार झालेला नाहीत, तर तुम्ही माझे लोक होण्याच्या योग्यतेचे नाही.
39
जे लोक मृत्यू पासून सुटका पाहण्यासाठी ते माझे आहेत यास नाकार देतात ते लोक अनंत काळाकरिता देवा सोबत राहू शकणार नाहीत; परंतु जे लोक माझ्याकरिता आपला प्राण गमावण्यास तयार आहेत आणि ते माझ्यावरील विश्वासामुळे आहे तर ते देवासोबत अनंत काळ वस्ती करतील.
40
“जो कोणी तुमचे स्वागत करतो तो माझे स्वागत करत आहे, असे देव म्हणतो आणि जो कोणी माझे स्वागत करतो तो देवाचे स्वागत करत आहे अशा दृष्टिकोनातून देव त्या लोकांकडे पाहतो, जो माझे स्वागत करतो तो ज्याने मला पाठवले त्याचे स्वागत करतो.
41
एखादा व्यक्ती संदेष्टा आहे म्हणून जेव्हा लोक त्याचे स्वागत करतात ते त्या संदेष्ट्याला देवापासून जे प्रतिफळ प्राप्त होणार असते तेच प्रतिफळ मिळवतात. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती नीतिमान आहे म्हणून जर कोणी त्या व्यक्तीचे स्वागत करत असेल तर त्या नीतिमान व्यक्तीला देवापासून मिळणारे प्रतिफळही हे लोक प्राप्त करत असतात.
42
याची नोंद घ्या: तुम्ही कोणत्याही प्रकारे महत्त्वाची व्यक्ती नसूनही केवळ माझ्या शिष्यांपैकी एक आहात आणि तुम्हांला तहान लागली आहे हे पाहून जर कोणी तुम्हाला थंड पाणी पिण्यासाठी दिले तर देव नक्कीच अशा लोकांना त्यांचे प्रतिफळ देईल.”