1
आता मात्र योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्व सेवकांसमोर दुःख रोखून धरता येईना. तो मोठ्याने रडला. तो म्हणाला, “येथील सर्व लोकांस येथून बाहेर जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले. केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले. मग योसेफाने आपली ओळख त्यांना दिली.
2
तो मोठ्याने रडला. मिसर देशाच्या लोकांनी व फारो राजाच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले.
3
मग योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय?” परंतु त्याचे भाऊ त्यास काही उत्तर देऊ शकले नाहीत. त्याच्या समोर ते फार घाबरले होते.
4
तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या.” तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, “तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले.
5
आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती.
6
हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही.
7
देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे, यासाठी की, तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष रहावे आणि तुम्हास जिवंत ठेवून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.
8
मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या वडिलासमान केले आहे. त्यामुळे मी फारोच्या घरादाराचा धनी आणि सर्व मिसर देशाचा अधिकारी झालो आहे.”
9
योसेफ म्हणाला, “तर आता ताबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा. त्यास सांगा की, तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हास संदेश पाठवला आहे. देवाने मला अवघ्या मिसर देशाचा धनी केले आहे. तर माझ्याकडे खाली निघून या. उशीर करू नका.
10
तुम्ही माझ्याजवळ गोशेन प्रांतात राहा. आणि तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि जे काही तुमचे आहे ते माझ्याजवळ राहील.
11
येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुम्हास सर्व प्रकारचा पुरवठा करीन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावून गरीब होण्याची वेळ येणार नाही.
12
पाहा, माझे तोंड तुम्हाशी बोलत आहे हे तुमचे डोळे, व माझा भाऊ बन्यामीन याचे डोळे पाहत आहेत.
13
मिसर देशातील माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्यासंबंधी माझ्या बापाला सांगा. आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे खाली घेऊन या.”
14
मग त्याने आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारली आणि गळ्यात पडून रडला, आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला.
15
मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली व त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.