1
याकोबापासून लेआस झालेली मुलगी दीना ही त्या देशातील मुलींना भेटण्यास बाहेर गेली.
2
तेव्हा त्या देशाचा राजा हमोर हिव्वी याचा मुलगा शखेम याने तिला पाहिले तो तिला घेऊन गेला, आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.
3
याकोबाची मुलगी दीना हिच्याकडे तो आकर्षित झाला. त्या मुलीवर त्याचे प्रेम जडले आणि तो प्रेमळपणे तिच्याशी बोलला.
4
शखेमाने आपला बाप हमोर ह्याला म्हटले, “ही मुलगी मला पत्नी करून द्या.”
5
आपली मुलगी दीना हिला त्याने भ्रष्ट केले हे याकोबाने ऐकले. परंतु त्याची सर्व मुले गुराढोरांबरोबर रानात होती म्हणून ते घरी येईपर्यंत याकोब शांतच राहिला.
6
शखेमाचा बाप हमोर बोलणी करण्यासाठी याकोबाकडे गेला.
7
जे काही घडले ते याकोबाच्या मुलांनी रानात ऐकले आणि ते परत आले. ती माणसे दुखावली गेली होती. त्यांचा राग भडकला होता, कारण याकोबाच्या मुलीवर शखेमाने बळजबरी करून इस्राएलाला काळिमा लावला, जे करू नये ते त्याने केले होते.
8
हमोर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम तुमच्या मुलीवर प्रेम करतो. मी तुम्हास विनंती करतो की ती त्यास पत्नी म्हणून द्या.
9
आमच्या बरोबर सोयरीक करा, तुमच्या मुली आम्हांला द्या, आणि आमच्या मुली तुमच्यासाठी घ्या.
10
तुम्ही आमच्या बरोबर राहा, आणि हा देश राहण्यास व व्यापार करण्यास तुमच्यापुढे मोकळा असेल, आणि त्यामध्ये मालमत्ता घ्या.”
11
शखेम तिच्या बापाला व तिच्या भावांना म्हणाला, “माझ्यावर तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून तुम्ही जे काही मागाल ते मी जरुर देईन.
12
माझ्याकडे वधूबद्दल मोठी किंमत मागा, जे काही तुम्ही मागाल ते मी तुम्हास देईन, परंतु ही मुलगी मला पत्नी म्हणून द्या.”
13
त्यांची बहीण दीना हिला शखेमाने भ्रष्ट केले होते, म्हणून याकोबाच्या मुलांनी शखेम व त्याचा बाप हमोर यांना कपटाने उत्तर दिले.
14
ते त्यास म्हणाले, “ज्याची अद्याप सुंता झालेली नाही अशा मनुष्यास आम्ही आमची बहीण देऊ शकत नाही; त्यामुळे आम्हांला कलंक लागेल.
15
पण फक्त या एकाच अटीवर आम्ही तुझ्याशी सहमत होऊ: तुम्हा सर्वांची आमच्याप्रमाणे सुंता झाली पाहिजे, जर तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता झाली तरच
16
आम्ही आमच्या मुली तुम्हास देऊ व तुमच्या मुली आम्ही करू आणि आम्ही तुम्हामध्ये राहू आणि आपण सर्व एक लोक होऊ.
17
पण जर तुम्ही आमचे ऐकणार नाही आणि सुंता करावयास नकार द्याल तर मग मात्र आमच्या बहिणीला घेऊ आणि निघून जाऊ.”